,

लोकेशन शेअरिंगसाठी ‘गुगल लॅटिट्यूड’

February 5, 2009 2 comments

फेसबुक, ट्विटर यांच्या मोबाईल एडिशन्स वेगाने लोकप्रिय होत असतानाच आता गुगलने मोबाईलच्या वापराला एक नवी दिशा प्राप्त करून दिली आहे. गुगलने ‘मॅप्स’ प्रोजेक्ट अंतर्गत ‘लॅटिट्यूड’ या नव्या प्रॉडक्टची आज घोषणा केली. पुण्यात जंगली महाराज रोडवर फिरताना माझ्या एका मित्राने त्याच्या क्लाएंटला तो सोलापूर रोडवर टॅफिक जॅममध्ये अडकल्याचे सांगितल्याचे मला आठवतेय. पण 'गुगल लॅटिट्यूड'वरून तुम्ही तुमच्या मित्रांची अशी फसवणूक नक्कीच करू शकणार नाही. तुमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तुम्ही नेमके कुठे आहात, हे आता तुमच्या जी-टॉकवरील मित्रांना कळू शकणार आहे!

‘गुगल लॅटिट्यूड’ ही अतिशय साधी-सोपी अशी सेवा आहे. तुमच्याकडे सिंबियन एस ६० सपोर्टेड फोन्स (अथर्थात बहुतांश नोकिया स्मार्टफोन्स), विंडोज मोबाईल ५.० आणि त्यापुढील अॉपरेटिंग सिस्टिम वापरणारे सर्व फोन्स आणि कलर ब्लॅकबेरी हँडसेट्सवर तुम्ही गुगल लॅटिट्यूड वापरू शकता. अँड्रॉईड अॉपरेटिंग सिस्टिम्स असलेल्या टी-मोबाईल जी-१ साठी व अॅपल आयफोनसाठी ही सेवा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे, जी-मेल ब्लॉगवर म्हटले आहे.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरून तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट करू शकता, प्रोफाईल पिक्चर बदलू शकता; तसेच तुमच्या लॅटिट्यूड फ्रेंड्सचे लोकेशनही पाहू शकता. तुमचे लोकेशन दाखवायचे नसल्यास, तसा अॉप्शन यात आहे. त्यामुळे घाबरून जाऊन ही सेवा ट्राय करण्याचे टाळू नका.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरण्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस कनेक्टिव्हिटी किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल मॅप्स अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. ते डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन http://www.google.com/latitude असे टाईप करा किंवा येथे क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक एंटर करा.
Read the full story

, , ,

अॉफलाईन जी-मेल

February 2, 2009 98 comments

अॉन-द-मूव्ह कनेक्टिव्हिटी ही संकल्पना आता भारतात लोकप्रिय होऊ लागलीये. रिलायन्स, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडियासारख्या मोबाईल कंपन्यांची वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा अनेक जण वापरत असतील. शिवाय मोबाईलवर इंटरनेट सर्फ करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. का कुणास ठाऊक, पण अॉन-द-मूव्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे ‘डोक्याला ताप,’ अशीच अनेकांची समजूत आहे. अॉन-द-मूव्ह कनेक्ट असण्याचा प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही केव्हाही एखादा महत्त्वाचा ई-मेल पाठवू शकता किंवा आलेल्या ई-मेलला उत्तर देऊ शकता. पण या कंपन्यांच्या डेटा कार्डवर विसंबून राहण्याची सोय नाही. मेलबॉक्स ओपन होण्यासच इतका वेळ लागतो, की तोपर्यंत समोरच्या माणसाला फोन करून किंवा एसएमएस करून निरोप पाठवता येऊ शकतो. एखादी फाईल पाठवायची असेल तर? डेटा कार्ड आणि हेवी अॅटॅचमेंट? फरगेट इट...बरं एखादा जुना मेल अोपन करून त्यातून काही माहिती मिळवायची असेल तर? महाराज, त्यासाठी मेलबॉक्स अोपन तर व्हायला हवा ना...आऊटलूक वापरणारे आलेले ई-मेल्स अॉफलाईन वाचू शकतात. पण जी-मेल वापरणाऱ्यांचे काय? आता जी-मेलवापरणारे देखील आपले मेल अॉफलाईन अॅक्सेस करू शकतात. जी-मेलने गेल्या आठवड्यात जी-मेल अॉफलाईन या सेवेची चाचणी सुरू केली आहे.

तुमच्या मेलबॉक्समधील सर्व कन्टेन्ट लोकल कॅश मेमरीत (Cache Memory) साठवून ठेवण्याचे काम जी-मेलतर्फे केले जाते. यासाठी ‘गुगल गिअर्स’ हे सॉफ्टवेअर वापरले जाते. गुगल अॉफलाईन अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही जोपर्यंत इंटरनेटला कनेक्ट असता तोपर्यंतचे तुमचे सर्व ई-मेल्स गुगलच्या सर्व्हरशी सिंक्रोनाईझ केले जातात. तुम्ही डिसकनेक्ट झाल्यानंतर जी-मेल आपोआप अॉफलाईन मोडमध्ये जाते. या मोडमध्ये तुम्ही ई-मेल वाचू शकता, महत्त्वाच्या ई-मेल्सना स्टार मार्क करू शकता आणि लेबलही लावू शकता. ई-मेलला उत्तर देणेही शक्य होते; पण मेल पाठवता येऊ शकता नाही. तुमचे उत्तर आऊटबॉक्समध्ये सेव्ह होते व तुम्ही पुन्हा इंटरनेटला कनेक्ट झाला की, लगेच आऊटबॉक्समधील मेल पाठवले जाते. अॉफलाईन जी-मेलमधून अॅटॅच केलेल्या फाईल्स डाऊनलोड करता येत नाहीत, तसेच मेसेजेस डिलीट करता येत नाहीत. अॉफलाईन जी-मेलची अद्याप चाचणी सुरू आहे. त्यामुळे ते वापरताना काही अडचणी येऊ शकतात, असे गुगलने जी-मेलब्लॉगवर म्हटले आहे.

अॉफलाईन जी-मेल अॅक्टिव्हेट करण्यासाठीः
१. तुमच्या मेलबॉक्समध्ये वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या जी-मेल लॅब्जच्या आयकॉनवर क्लिक करा. किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन लॅब्ज या टॅबवर क्लिक करा.
२. आता जी-मेल अॉफलाईन हे फीचर एनेबल करा. या पेजमध्ये सर्वांत खाली सेव्ह चेंजेस असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करा.
३. आता पुन्हा इनबॉक्समध्ये या. वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Offline 0.1 अशी लिंक अॅक्टिव्हेट झाली असेल. त्यावर क्लिक करून गुगल गिअर्स इन्स्टॉल करा.
४. पूर्ण इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला ब्राऊजर रिस्टार्ट करावे लागेल.
५. आता तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील जी-मेल अॅक्सेस करू शकता.
Read the full story