, , ,

इंटेलिजंट बिझनेससाठी...

June 3, 2009 Leave a Comment

डेंटिस्टपासून ते मोबाईल स्टोअर शोधण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी ‘गुगल’ वापरणे आजकाल सोयीचे जाते. या अशा साऱ्या गोष्टी असतात यलो पेजेसमध्ये मिळतात; पण तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अशी जाडजूड यलो पेजेस डिरेक्टरी बाळगत नाहीत. एखादं चांगलं चायनीज रेस्टॉरंट शोधण्यासाठी आपण मोबाईलचा पर्याय अधिक पसंत करू. तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही गुगल लोकलच्या आधारे सर्च करू शकता. यासाठी गुगलने ठिकठिकाणच्या आघाडीच्या यलो पेजेस कंपन्यांशी अगोदरंच टाय-अप्स केले आहेत. पण गल्लीतला पानवाला, इस्त्रीवाला, किरकोळ किराणा दुकानदार, हेअर कटिंग सलून, गॅरेजेस, पंक्चर काढून देणारे आदींची माहिती या ‘यलो पेजेस’मध्येदेखील नसते. अशा प्रकारच्या कोणत्याही व्यावसायिकास आपला व्यवसाय गुगल लोकल आणि गुगल मॅप्सवर आणण्याची सुविधा गुगलने लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून अगोदरंच उपलब्ध करून दिली आहे. आता अशा व्यावसायिकांसाठी गुगलने अॅनालिटिक्ससारखी नवी सेवाही देऊ केली आहे.
लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुकानाची किंवा सेवेची माहिती देऊन (उदा. Anil Fruit Shop, Kumar Parisar Society, Kothrud, Pune) तुमचा व्यवसाय गुगल लोकल वर लिस्ट करू शकता. यानंतर संबंधित शहरातील किंवा प्रभागातील व्यक्तीने त्या अनुषंगाने सर्च केल्यास (Fruit Shop Kothrud) त्याला रिझल्टपेजवर तेथील व्यावसायिकांची माहिती व नकाशावर त्यांचे ठिकाण दिसेल. तुम्ही मोबाईलवरून सर्च करत असाल तर रिझल्टमध्ये डिस्प्ले झालेल्या टेलिफोन किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला थेट कॉलही करता येतो. तुम्हाला काही अॉफर्स द्यायच्या असतील तर त्याही यातून देता येतात. येणारे ग्राहक तुमच्या सेवेबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाही येथे देऊ शकतात. या माध्यमातून सर्च करून हवे ते दुकान किंवा सेवा शोधणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढतंच जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा व्यवसाय (उदा. तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमचा किराणा दुकानदार, ठरलेला पाणीपुरीवाला वगैरे) गुगल लोकलवर लिस्ट करू शकता.


या सेवेत गुगलने नुकतेच अॅनालिसिस डॅशबोर्डही अॅड केले आहे. याचा मुख्य फायदा असा की कोणत्या कीवर्डसाठी किती लोक तुमच्या लिस्टिंगवर आले, कुठून आले याची थेट माहिती तुम्हाला मिळू शकते. म्हणजे फ्रुट शॉपसाठी लोकांनी Fresh Fruits, Fruits, Vegetable and Fruits, Apple, Alphonso, Mangoes यापैकी कोणत्या कीवर्डने सर्च केले हेही तुम्हाला समजू शकते. यावरून तुम्हाला एखाद्या वस्तूच्या मागणीचा अंदाजही येऊ शकतो. म्हणजे एखादे महागडे फळ तुमच्या दुकानात नसेल आणि त्या फळाच्या नावाने सर्वाधिक सर्च होतोय, असे लक्षात आले तर तुम्ही ते फळ तुमच्या दुकानात ठेऊन चांगला व्यवसाय करू शकता. याचप्रमाणे लोक कोणत्या भागातून तुमच्या दुकानात येतात, हेही या डॅशबोर्डवरून कळू शकते. ज्या भागातून सर्वात जास्त लोक येतात त्या भागात एखादी शाखा सुरू करण्यास हरकत नाही, असा अंदाजही तुम्ही लावू शकता. स्थानिक व्यावसायिकांसाठी गुगलची ही सेवा नक्कीच उपयोगाची ठरणार आहे. या गटात मोडणाऱ्या किती लोकांकडे इंटरनेट असेल याबद्दल शंका असली तरी तुम्ही-आम्ही आपल्या जवळच्या लोकांना ही सेवा वापरून पाहण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन नक्कीच करू शकतो!

(माझाच अनुभव सांगतो. मागे एकदा डेंटल क्लिनिंगसाठी मी माझ्याच एरियातील डेंटिस्ट्स शोधत होतो. सर्चमध्ये त्या एरियातील पाच-सहा डेंटिस्ट्स सापडले. त्यापैकी दोन-तीन जणांकडे मी जाऊन आलो. पण त्यातील दोन बंद होते आणि एक डॉक्टर क्लिनिंग करत नव्हते. फिरता-फिरता मला आणखी एक डेंटिस्ट सापडले. मी त्यांच्याकडे गेलो. क्लिनिंग झाल्यानंतर मी डॉक्टरांना म्हणालो की, डॉक्टर, तुमच्या शेजारच्या तीन-चार डॉक्टरांची नावं गुगल सर्चमध्ये येतात; पण तुमचं नाव त्यात नाहीये. त्यांना याचा काही गंध नव्हता. पण त्यांच्या डेस्कवर लॅपटॉप होता. नशीबाने इंटरनेटही होते. मी त्यांचे क्लिनिक गुगल लोकलवर लिस्ट केले. डॉक्टर खूश झाले. त्यांनी माझ्याकडून शंभर रुपये कमी घेतले आणि पुढच्या दिवाळीला ग्रिटींगही पाठवले!)

आणखी एकः
मित्रांनो, २७ मे रोजी साधी-सोपी टेक्नॉलॉजीला एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारीपर्यंत जोमाने लिहिल्यानंतर थोडासा ब्रेक हवा होता. त्यामुळे ‘गुगल लॅटिट््यूड’ या शेवटच्या पोस्टनंतर लिखाण केले नाही. पण ब्लॉगला रोज भेट देणाऱ्यांची संख्या उत्साहवर्धक होती. त्यानंतरच्या चार महिन्यांत दरमहा हजारभर हिट्स ब्लॉगला मिळत होत्या. आजपासून पुन्हा एकदा नव्याने लिखाण करण्याचा विचार आहे.
तुमच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...

Related Posts :



4 comments »

  • Prakash Ghatpande said:  

    मस्तच अमित,
    साधी-सोपी टेक्नॊलॊजी आपलीशी का वाटते? सोप आहे यातील संवादी भाषा.

  • Amit Tekale said:  

    धन्यवाद प्रकाशजी.
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद. माझ्या या प्रयत्नाला आपला असाच प्रतिसाद मिळत राहील, ही अपेक्षा.

  • Anonymous said:  

    в итоге: восхитительно! а82ч

  • Anonymous said:  

    नमस्कार अमित मी तुज्हे आर्टिकल लोकमत मधे नेहमी वाचतो कधी चाट वर भेट महत्वाचे बोलायाचे आहे add me skalambe2@gmail.com