आईसाठी ‘माहेर’, दादा-वहिनीसाठी ‘मेनका’ आणि तुमच्यासाठी ‘जत्रा’!

[ October 23, 2010 | 10 comments ]


नमस्कार मित्रांनो,
आज अनेक महिन्यांनंतर या ब्लॉगवर लिहितोय. ‘सकाळ’च्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले काही लेख मी जानेवारीमध्ये पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा खंड पडला. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज ही पोस्ट लिहिण्याचा उद्देश काहीसा वेगळा आहे.

गेल्या सप्टेंबरमध्ये मी नोकरीतून बाहेर पडलो. ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी, माझा बालपणापासूनचा मित्र गणेश कुलकर्णी आणि आमचा कॉमन फ्रेंड सुनील गोखले (हा ‘आयटी’त होता) आणि मी - अशा पाच जणांनी एकत्र येऊन ‘मीडियानेक्स्ट’ ही माध्यम सेवा पुरविणारी कंपनी स्थापन केली. १४ अॉक्टोबर २००९ रोजी स्थापन झालेल्या आमच्या कंपनीनं मे २०१० मध्ये पु. वि. बेहेरे यांनी सुरू केलेल्या ‘मेनका प्रकाशन’चं संपादन केलं. आमच्या कंपनीच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.

गेल्या पन्नास वर्षांपासून रसिक मराठी वाचकांचे मनोरंजन करणारी माहेर, मेनका सारखी मासिकं, जत्रासारखा दर्जेदार विनोदी दिवाळी अंक आणि शंभरेक पुस्तकं...एवढा सगळा पसारा आता आम्ही चालवणार होतो. त्यात काही महिन्यांवर आलेली दिवाळी...मराठीतल्या ‘टॉप फाईव्ह‘ दिवाळी अंकांत गणना होणारे तीन दिवाळी अंक आम्हाला प्रसिद्ध करावयाचे होते. कथा, कादांबऱ्यांसाठी मान्यवर लेखक मंडळींसह नव्या दमाच्या लेखकांशी संपर्क करणे, कथाचित्रे, हास्यचित्रांसाठी नामवंत चित्रकार मंडळीशी संवाद साधणे, लेख, मुलाखती, फोटो शूट...त्यानंतर तब्बल साडेसातशे पानांचा ले-आऊट, दरम्यान राज्यभरातल्या वितरकांच्या भेटी, जाहिरातदारांशी संपर्क, अंक प्रसिद्धीचे नियोजन...शिवाय मीडियानेक्स्टची कामं...कामांची ही लांबलचक यादी आणि हाती असलेला तोकडा वेळ...पण गाठीशी असलेला अनुभव, जनसंपर्क आणि वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर आम्ही माहेर, मेनका आणि जत्राचे दिवाळी अंक अगदी वेळेत; म्हणजे कोजागरी पौर्णिमेनंतर लगेचच बाजारात आणत आहोत.
चावट-वात्रट विनोदांची फटकेबाजी करणारा जत्राचा दिवाळी अंक आणि ‘मधुचंद्र विशेष‘ अशी मूळ कल्पना घेऊन माहितीपर लेख आणि शृंगारिक कथांनी सजलेला मेनकाचा दिवाळी अंक येत्या सोमवारपर्यंत (२५ अॉक्टोबर) बाजारात दाखल होताहेत. त्यानंतर दोन दिवसांना मराठी स्त्रीची विश्वासाची सोबत असलेला माहेरचा दिवाळी अंकही बाजारात दाखल होईल.

िदवाळी अंक ही संकल्पना केवळ मराठी भाषेत राबविली जाते. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण - अर्थात - मराठी माणसांनी जन्माला घातलेली, वाढवलेली आणि जोपासलेली ही संस्कृती टिकावी, वाढावी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या तिन्ही दिवाळी अंकांचा दर्जा वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलाय. आपण त्याला प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा.

या तिन्ही अंकाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
माहेर आणि मेनकाचे वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.

माहेर, मेनका आणि जत्रा या दिवाळी अंकांची किंमत प्रत्येकी १०० रुपये आहे. दिवाळी अंक घरपोच हवे असल्यास ३० रुपये टपालखर्चासह (भारतातील वाचकांनी) मनीअॉर्डर अथवा मेनका प्रकाशन (Menaka Prakashan) या नावाचा चेक पुढील पत्त्यावर पाठवावा.

मनीअॉर्डर/चेकने अंक मागविणाऱ्यांसाठीः

‘माहेर’ दिवाळी २०१० ः रु. १०० + रु. ३० = रु. १३०
‘मेनका’ दिवाळी २०१० ः रु. १०० + रु. ३० = रु. १३०
‘जत्रा’ दिवाळी २०१० ः रु. १०० + रु. ३० = रु. १३०
माहेर + मेनका + जत्रा एकत्रित ः रु. ३०० + रु. ६० = रु. ३६०

पत्ताः
मेनका प्रकाशन, २११७, सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी, पुणे - ४११०३०
दूरध्वनीः ०२०-२४३३६९६०, ६४०१३७९५

अॉनलाईन बुकिंग करणाऱ्यांसाठीः
भारतातील (डोमेस्टिक) आणि परदेशातील (इंटरनॅशनल) वाचक अॉनलाईन पेमेंट करूनही अंक मागवू शकतात. त्यासाठी पुढील लिंक्स फॉलो करा ः
'माहेर’ दिवाळी २०१० : डोमेस्टिक ($ 3.50) I इंटरनॅशनल ($.7.95)
‘मेनका’ दिवाळी २०१० : डोमेस्टिक ($ 3.50) I इंटरनॅशनल ($.7.95)
‘जत्रा’ दिवाळी २०१० : डोमेस्टिक ($ 3.50) I इंटरनॅशनल ($.7.95)
माहेर + मेनका + जत्रा एकत्रित : डोमेस्टिक ($ 9.00) I इंटरनॅशनल ($21.00)


विविध देशांत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र मंडळांना आवाहनः
आपल्या सदस्यांना माहेर, मेनका आणि जत्रा हे दिवाळी अंक हवे असल्यास sales@menakaprakashan.com यावर ई-मेल करा.
Read the full story »
,

40 कोटींमधला आणखी एक सचिन

[ January 20, 2010 | 3 comments ]
सचिन सीताराम देसाई
या तरुणाला तुम्ही ओळखता?
वय ः 24, राहणार ः नंदुरबार
आलं काही लक्षात?
काळे डोळे, उंची साधारण पावणेसहा फूट
आठवतंय काही?
ट्रेकिंगची आवड, किशोर कुमार फॅन
अजूनही "क्‍लिक' होत नाहीये?
धुळ्यातील एका प्रोफेशनल कॉलेजमध्ये शिकतो.
छ्याऽऽ काहीच लक्षात येत नाहीये. कोण आहे हा सचिन सीताराम देसाई?
तुम्हाला फक्त सचिन रमेश तेंडुलकरच माहीत असेल. पण 110 कोटींच्या आपल्या देशातील 40 कोटींहून अधिक जण "तरुण' वर्गात मोडतात. त्यात किमान एक कोटी "सचिन' असतील असे गृहित धरूयात. यातील फक्त एक सचिन आपल्याला माहित आहे. इतर 99 लाख 99 हजार 999 सचिन अजूनही आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताहेत...

सचिन सीताराम देसाई तुम्हाला माहीत नसेल. पण त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सुरवात केली आहे. ब्राझिल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान येथे त्याला ओळखणारे किमान 50-60 तरुण आहेत. त्याच्या गावात, महाराष्ट्रात आणि भारतात मिळून त्याचे 200 हून अधिक जणांशी नेटवर्किंग आहे. या नेटवर्कमधील मित्र-मैत्रिणींशी तो कायम संपर्कात असतो. कसा? अर्थात...इंटरनेटच्या साह्याने. सचिन सीताराम देसाई 4 वेगवेगळ्या ऑनलाईन नेटवर्किंग साइट्‌सचा सदस्य आहे. या साइट्‌सच्या माध्यमातून त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. सचिन "एमबीबीएस'च्या अंतिम वर्षात आहे. त्याच्या वयाच्या आणि परदेशात हाच अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांशी त्याने ऑनलाइन मैत्री केली आहे. त्यांच्या मदतीने तो जगाच्या विविध भागांत वैद्यकीय क्षेत्रांत आणि तंत्रज्ञानात काय बदल होताहेत याची माहिती मिळवितो. यात काही वाईट आहे, असं वाटतं तुम्हाला?

नव्या युगातील तरुणांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत होत आहे आणि त्यांना अशा प्रकारची मदत उपलब्ध करून देणे हे पालकांचे आणि इतर काळजीवाहूंचे कर्तव्य ठरणार आहे. तारुण्यात प्रवेश करणाऱ्यांसमोरचा एक महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे स्वतंत्र अस्तित्व अर्थात "आयडेंटिटी'. हा काळ अत्यंत नाजूक असतो, याची पालकांना कल्पना असते. तथापि, या संक्रमणात आपलीही काही भूमिका असते, हे विसरून गेल्यास त्याचा थेट परिणाम पाल्यांवर होतो. तुला कशाला हवाय मोबाइल, जास्त वेळ इंटरनेट वापरायचे नाही, काल कुणाशी चॅटिंग चालले होते, दिवसभर काय चॅटिंग करायचे अशा प्रश्‍नांचा भडिमार करून काहीही साध्य होणार नाही. उलट आपल्या पाल्याची आपण घुसमट करतोय, हे ध्यानात घ्यावे. पाल्याच्या सवयींवर नजर ठेवणे, तो किंवा ती काही गैरप्रकार करत नाहीये ना यावर लक्ष ठेवणे यात काहीही वाईट नाही. तथापि, हे कारण देऊन त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे योग्य नव्हे.

नव्या भाषेत सांगायचे झाले तर "पीअर टू पीअर इंटरॅक्‍शन'ला येणाऱ्या काळात महत्त्व प्राप्त होणार आहे. आज अनेक व्यवहार हे केवळ ई-मेलच्या माध्यमातून होतात. माझा व्यवसाय वाढविण्यासाठी जगाच्या पाठीवर एखादा उत्तम "पार्टनर' मिळतोय का येथपासून माया सोबत आयुष्य काढण्यासाठी सुयोग्य "लाइफ पार्टनर' मिळतोय का, हे तपासण्यासाठीदेखील बहुतांश तरुण आज "ऑनलाईन नेटवर्किंग' साइट्‌सचा वापर करतात आणि विशेष म्हणजे त्यात ते यशस्वीदेखील होतात. थोडक्‍यात, स्वतंत्र अस्तित्व विकसित करण्यासाठी तरुणांना तीन प्रक्रियांतून जावे लागते.
1. Reflexivity
2. Makeability
3. Individualisation
रिफ्लेक्‍सिव्हिटी म्हणजे वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर स्वतःची प्रतिमा तयार करणे, मेकॅबिलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीवरून प्रभावित होऊन स्वतःची लाइफस्टाइल किंवा स्वतःच्या आवडीनिवडी ठरविणे आणि इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे इतरांच्या भाऊगर्दीत अंतर्मनाला अधिक "स्पेस' देणे. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आजच्या काळात तंत्रज्ञानाला पर्याय नाही.

मायस्पेस, फेसबुक, ऑर्कुट, बझओव्हनसारख्या ऑनलाईन नेटवर्किंग वेबसाईटच्या माध्यमातून जगभरातील 15 कोटींहून अधिक तरुण एकमेकांशी जोडले गेले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे भौतिक सीमारेषा पुसट होऊन जगात "बॉर्डरलेस नेशन्स' तयार होत आहेत. या सीमारेषा संपूर्णपणे पुसून टाकण्याचे काम तरुण पिढीच करणार आहे. त्यांना या कामात आपण मदत करू इच्छिता, की अशा वेबसाइट्‌सवर बंदी आणून या सीमारेषा आणखी गडद करू इच्छिता?
Read the full story »
,

एडिसनचा फॉर्म्युला!

[ January 18, 2010 | 4 comments ]

भूगोल आणि विज्ञान यात फरक काय, असं विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल? भूगोलात "डिस्कव्हरी' असते अन्‌ विज्ञानात "इन्व्हेन्शन'! जी गोष्ट अस्तित्वात आहे, ती शोधून काढणे म्हणजे "डिस्कव्हरी' आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही ती प्रयोगांतून निर्माण करणे म्हणजे "इन्व्हेन्शन'. "डिस्कव्हरी'साठी शारीरिक कष्ट घ्यावे लागतात, तर "इन्व्हेन्शन'साठी मानसिक, असा तुमचा समज असेल. यात तथ्य आहे; पण हे 100 टक्के सत्य नाही. जगातील बहुतांश "इन्व्हेन्शन्स' ही 99ः1 या फॉर्म्युल्यातून आली आहेत. काय आहे हा फॉर्म्युला?

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन सर्वांना माहीत असतील. एडिसनने विद्युत दिव्यांचा अर्थात बल्बचा शोध लावला. ज्या काळातील नागरिक वीज किंवा अखंड तेवत राहणारा आणि झटक्‍यात बंद किंवा झटक्‍यात सुरू होणारा दिवा अशी कल्पनादेखील करू शकत नव्हते, त्या काळात एडिसनने कल्पकतेच्या जोरावर सातत्याने प्रयोग सुरू ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि जग प्रकाशमय झाले. याचा अर्थ कोणत्याही "टेक्‍नॉलॉजी इन्व्हेन्शन"ला 100 टक्के कल्पकतेची जोड लागते, असा होऊ शकतो; पण तो तसा नाहीये. "इन्व्हेन्शन'चा फॉर्म्युला आहे - 99 टक्के प्रयत्न आणि 1 टक्का कल्पकता! त्यामुळे नवउद्योजक किंवा आंत्रप्रिन्युअर यांनी कल्पकतेचा बाऊ करू नये. माहिती-तंत्रज्ञानात काम करणाऱ्यांना याची अनेक वेळा प्रचिती आलेली असेल. एखादे नवे सॉफ्टवेअर तयार करताना त्याच्यामागचे नेमके लॉजिक तयार करताना मेंदूला जितके कष्ट होतात, त्यापेक्षा अधिक कष्ट ते सॉफ्टवेअर प्रत्यक्षात उतरवताना तुमच्या शरीराला होतात. प्रत्यक्षात "बल्ब' साकारण्यापूर्वी एडिसनला सुमारे 10 हजार प्रयोग करावे लागले होते; त्यासमोर सॉफ्टवेअरची काय गत?

99ः1 हा फॉर्म्युला तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच कामांना लागू होतो, असे दिसते. यात कल्पकतेचा भाग केवळ एक टक्का असला तरी तो तितकाच महत्त्वाचा ठरतो. नवे आणि अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणावयाचे झाल्यास कोणीही दिलेली कोणतीही कल्पना टाकाऊ आहे म्हणून नाकारू नका. प्रथमदर्शनी अर्थहीन वाटणारी कल्पनाच तुम्हाला करोडपती बनवू शकते. फक्त त्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. प्रयत्नशीलतेचे घटक म्हणजे- त्या विषयाबद्दल सतत काहीतरी वाचत राहणे, वेबसाईट्‌सचा वापर करून नवी माहिती आणि अपडेट्‌स मिळविणे, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटून योग्य प्रश्‍न विचारणे आणि तुम्हाला नेमके काय हवे, ते नोंदवून ठेवणे. कल्पकता ही उपजतच असते; त्याचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. एडिसनसारख्या महान शास्त्रज्ञाने अकल्पनीय वाटावा असा बल्बचा शोध लावला आणि तरीदेखील यातील 1 टक्काच श्रेय तो कल्पकतेला देतो, यावरून प्रयत्नशीलतेचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.
प्रयत्नशीलता आणि कल्पकता यांत मूलभूत फरक असला तरी दोन्ही बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. प्रयत्नशीलतेशी निगडित आणखी एक मुद्दा इथे सांगावासा वाटतोय. 99 टक्‍क्‍यांच्या पूर्ततेसाठी तुम्हाला तीन "आर'चा (रीसर्च, रिट्राईव्ह आणि रेकॉर्ड इन्फॉर्मेशन) प्रचंड फायदा होणार आहे. बऱ्याच वेळा आपण रीसर्च करतो; परंतु वेळेअभावी ती माहिती काढून संग्रही ठेवण्याचा कंटाळा करतो. पुढे एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला ती माहिती लागते. संग्रही नसल्यामुळे त्या वेळी पुन्हा शोधाशोध करण्यात तितकाच वेळ दवडावा लागतो. त्यामुळे हे तीन "आर' पाळणे महत्त्वाचे ठरते. ते पाळण्यासाठी आज आपण विविध तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तंत्रज्ञानच कामी येते, हेही सिद्ध होते. तुम्हीही एखाद्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, की कल्पकता 1 आणि प्रयत्नशीलता 99!
Read the full story »
,

(ओपनिंग शॉर्टली) मेसर्स मुळा-मुठा वॉटर फ्युएल पंप

[ January 15, 2010 | 1 comments ]
कट्ट्यावरच्या गप्पांना चांगलाच रंग चढला होता. गुढीपाडवा नुकताच झाल्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही तरी सांगण्यासारखं होतं. संजयने नवा मोबाईल घेतला होता, वैशालीने लॅपटॉप; तर सुनीलने हॅंडिकॅम. साहिल अजूनही आला नव्हता. त्यामुळे एकीकडे नव्या वस्तू हाताळताना साहिलच्या नावाने तिघांचा शिव्याशाप सुरू होता. तेवढ्यात नव्या कोऱ्या गाडीचा हॉर्न वाजवत साहिल आला आणि तिघे जण शिव्या देत त्याच्या नव्या गाडीला न्याहाळू लागले. चार शब्दांच्या स्तुतीनंतर मंडळी "नॉर्मल'ला आली.
""सायल्या, पगार वाढलाय ना पुरेसा? नाही... म्हटलं आठ दिवस गाडीत येशील आणि पेट्रोलला हजार रुपये जाताहेत असं लक्षात आलं की परत गाडी"वर' येशील,'' संजयने खेचाखेचीस सुरवात केली.
""साहिल, तू एक काम कर. शिवानी आणि तू पेट्रोलसाठी "टीटीएमएम' करत जा. म्हणजे तुझ्या एकट्यावर "लोड' येणार नाही.'' वैशालीने टपली मारली.
""अरे गप्प बसा. तुम्हाला साहिल म्हणजे कारकून वाटला की काय? आपला दोस्त इंजिनिअर आहे. वेळ पडली तर पाण्याचेही पेट्रोल करेल!'' सुनीलने वाक्‍य संपवताच काही सेकंद सगळेजण शांत होते. त्याने हळूच डोळा मारला आणि सगळे खो-खो हसत सुटले.

यातील मजेचा भाग सोडून दिला तरी नव्याने वाहन घेणाऱ्यांनी आणि सध्याच्या वाहनधारकांनी कधी असा विचार केलाय? अख्खे जग ज्या तेलामुळे पेटून उठले आहे ते किती दिवस पुरणार आहे? भूगर्भात तेलाचे मुबलक साठे आहेत, असे म्हणण्याचे दिवस केव्हाच निघून गेले. खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांनादेखील तेलाच्या चिंतेमुळे झोप येत नाही. इथेनॉलपासून गाड्या चालवता येतात की नाही, याची खात्री करण्यासाठी ते नुकतेच ब्राझीलला जाऊन आले. 2025 पर्यंत तेलाची जागतिक मागणी आतापेक्षा 100 टक्‍क्‍यांनी वाढलेली असेल; आणि भारतातील तेलाची मागणी सुमारे 150 टक्‍क्‍यांनी वाढलेली असेल. भविष्यात भारत आणि चीनमुळे जागतिक पातळीवरील मागणी आणि पुरवठ्याची गणिते बदलण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत गाड्या न वापरणे, इतर पर्यायी इंधन वापरणे किंवा पाण्याचे पेट्रोल करणे हेच पर्याय आपल्यासमोर असणार आहेत.

पाण्याचे रासायनिक गुणधर्म पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्‍सिजनचा एक अणू यांपासून पाण्याचा एक रेणू तयार होतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक शास्त्रज्ञ या रासायनिक समीकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहेत. साधारण वर्षभरापूर्वी अमेरिकेतील डॅनी क्‍लेन या संशोधकाने आपली फोर्ड एस्कॉर्ट गाडी चक्क पाण्यावर चालवून दाखविली! डॅनीने पाणीमिश्रित पेट्रोल किंवा फक्त पाणी अशा दोन्ही शक्‍यता पडताळून पाहिल्या आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. सुरवातीस सांगितल्याप्रमाणे पाण्यातील हायड्रोजनचा वापर करून डॅनीने ही किमया घडवून आणली. इलेक्‍ट्रोलिसिस या प्रक्रियेच्या साह्याने त्यांनी पाण्याचे अर्थात "एचटूओ'चे (H20) "एचएचओ' (HHO) या वायूमध्ये रूपांतर केले. या यंत्रणेस "हायब्रीड हायड्रोजन ऑक्‍सिजन सिस्टिम' (एचएचओएस) असे नाव दिले तर त्यातून तयार होणाऱ्या वायूस त्यांनी "ऍक्‍युजेन गॅस' असे नाव दिले. गाडीच्या इंजिनमध्ये किरकोळ बदल करून "ऍक्‍युजेन' जनरेटर बसविला, की तुमचीही गाडी पाण्यावर धावू लागेल. केवळ हायड्रोजन गॅसवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये उच्च दाबाने हायड्रोजन वायू साठवून ठेवावा लागतो. त्यामुळे चालकाच्या जिवास धोका निर्माण होतो. "ऍक्‍युजेन'मध्ये लागेल तशी हायड्रोजन वायूची निर्मिती केली जाते. शिवाय पेट्रोल किंवा डिझेलमध्ये ऍक्‍युजेन वापरल्यास गाडीचे "ऍव्हरेज' 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढते, असा दावाही डॅनी क्‍लेन यांनी केला आहे. "एचएचओ' वायूचा आणखी एक फायदा म्हणजे यात कुठेही कार्बन नसल्यामुळे या वायूचे पूर्ण ज्वलन होऊन शून्य प्रदूषण होते.

डॅनी क्‍लेन या यंत्रणेत आणखी काही सुधारणा करण्यासाठी अजूनही झटत आहेत. त्यांच्या कंपनीने व्यावसायिक तत्त्वावर ऍक्‍युजेन जनरेटरची विक्रीही सुरू केली आहे. आपल्याकडे प्रदूषण कमी करण्याकरिता "एलपीजी' किंवा "सीएनजी किट' बसविण्याची सक्ती करावी लागते. उद्या "ऍक्‍युजेन'सारखी यंत्रणा प्रचलित झाली आणि सर्व वाहनधारक पाणी वापरायला लागले तर किमान पाण्याचे भाव तरी सर्वसामान्यांना परवडतील असे राहावेत.
(सूचनाः ऍक्‍युजनेसारख्या यंत्रणेत डिस्टिल्ड वॉटर वापरावे लागते. त्यामुळे शेजारच्या ओढ्यातले किंवा मुळा-मुठेचे पाणी फुकट वापरता येईल, अशा कल्पनेत फार काळ रमू नये. तोपर्यंत मुळा-मुठेमधून "डिस्टिल्ड वॉटर' यायला लागले तर मात्र ते वापरता येईल.)
Read the full story »
,

नाऊ प्लेईंग ः चिवचिवाट डॉट एमपीथ्री

[ January 13, 2010 | 1 comments ]
भूतकाळ :
पु. लं.च्या "म्हैस' या प्रकरणातील पहाटेचा प्रसंग. पाचाची एष्टी साताला निघाली, असा उल्लेख करण्यापूर्वी एष्टीतील वातावरणाचं केलेलं फक्कड वर्णन. विविध वयोगटातील स्त्री-पुरुष एष्टीसारख्या वाहनात एकत्र आल्यानंतर जे काही होते त्याला मराठीत "गोंगाट' असे म्हणतात.
---
वर्तमानकाळ :
गणपती विसर्जनाचा दिवस. पुण्यनगरीतल्या लक्ष्मी रस्त्याचा परिसर. मिरवणुकीत समाविष्ट होण्यासाठी मंडळांत लागलेली चुरस आणि वातावरण दुमदुमून टाकणारा आवाज. आवाज कसला तो? त्याला मराठीत कानठळ्या बसणारा आवाज असे म्हणतात.
---
भविष्यकाळ :
रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकींच्या तोडीस आकाशातील विमानांची संख्याही वाढणार. एका मिनिटाला दोन विमाने सुटून दोन लॅंड होणार. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक सुरू झाल्यास ऐकू येणार तो डोकं बधिर करणारा आवाज!
---

पण एवढा कोलाहल आजही आहे, असे तुम्हाला पदोपदी जाणवत असेल. एसटी बस सोडली तरी कोणत्याही खासगी बसमध्ये (अगदी एसीसुद्घा) एक तर मोठ्या आवाजात चित्रपट लावलेला असतो किंवा एसीचा तरी आवाज सुरू असतो. लांबच्या प्रवासात शांतपणे गाणी ऐकावी तरी बाहेरचा आवाज एवढा मोठा असतो किंवा शेजारचा एखादा प्रवासी मोबाईलवर एवढ्या मोठ्याने बोलत असतो, की आपल्या एमपीथ्री प्लेअरचा किंवा वॉकमनचा आवाज आणखी मोठा करता आला असता तर बरे झाले असते, असे वाटायला लागते. पण डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार, बाहेरचा आवाज दाबण्यासाठी वॉकमनचा आवाज वाढविणे अयोग्य आहे. असे केल्याने तुमच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हेडफोन काढल्यानंतरही कानांत गाण्याचा आवाज घुमत असेल तर तुमच्या कानाला धोका आहे, असे समजा. अशा दुहेरी अडचणीत बाहेरील आवाजाचा कसलाही त्रास होऊ न देता गाण्यांचा निखळ आनंद देणारे "आरोग्यवर्धक' हेडफोन मिळाले तर?

सोनी, बोस आणि इतर काही कंपन्यांनी ग्राहकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नावर उत्तर म्हणून "नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स' बाजारात आणले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच बाजारात आलेल्या या हेडफोन्सना सतत प्रवास करणाऱ्या ग्राहकांनीही पसंती दिली आहे. या हेडफोन्सवर दोन सूक्ष्म मायक्रोफोन बसविलेले आहेत. समजा तुम्ही ट्रेनने प्रवास करीत आहात. तुमचे सहप्रवासी मोठ्या आवाजात गप्पा मारीत आहेत. खिडकी उघडी असल्याने बाहेरचे आवाज आणि ट्रेनचा खडखडाटही स्पष्ट ऐकू येतोय. अशा परिस्थितीत तुम्ही "नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स' वापरले तर त्यास बसविलेले सूक्ष्म मायक्रोफोन्स आधी हा बाहेरील आवाज टिपतात. तो तुमच्या कानांत शिरण्याच्या आत टिपला जातो. हा आवाज एका इलेक्‍ट्रॉनिक सर्किटमध्ये वळवून त्यातील पॉझिटिव्ह वेव्ह्‌ज निगेटिव्ह केल्या जातात. थोडक्‍यात, त्या आवाजाची तीव्रता पाच असेल तर ती शून्याच्या खाली नेली जाते आणि तुम्हाला काही समजण्याच्या आता तो आवाज तुम्ही जे गाणे ऐकत असाल त्यात मिसळला जातो. परंतु त्याची तीव्रता कमी झाल्याने तो तुम्हाला ऐकूदेखील येत नाही. त्यामुळे तुम्ही श्रेया घोषालच्या आवाजातील पल...पल...पल...पल हर पल हर पल...तेवढ्याच गोडव्यासह ऐकू शकता.

प्रश्‍न राहतो तो अशा हेडफोन्सची गरज भासण्याचा. ध्वनिप्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता भविष्यकाळात सर्वांनाच अशा प्रकारचे हेडफोन घालून फिरण्याची वेळ येईल असे वाटणे साहजिक आहे. मात्र अशी वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करणे हे आपल्याच हातात आहे. ट्रॅफिक जाम असताना आणि आपल्या समोरील वाहनचालक एक सेंटिमीटरदेखील पुढे-मागे सरकू शकत नाही हे माहीत असताना हॉर्न वाजविणे, रात्री-अपरात्री फटाके फोडणे, चार कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अख्ख्या कॉलनीला ढोल-ताशे ऐकविणे, कारण नसताना मोबाईलवर मोठ्याने बोलणे, आदी बाबी टाळता येऊ शकतात. कुछ मिनटों की तो बात है, आम्ही काय रोज जिंकतो का, अशी कारणे देणे सोपे आहे; पण कानाला सतत हेडफोन लावून फिरण्याची वेळ आली तर चिमण्यांचा चिवचिवाट आणि कोंबड्याचा आरवदेखील "एमपीथ्री' फॉरमॅटमध्ये ऐकावा लागेल...तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

Read the full story »
,

Username: Leadership I Password: **********

[ January 11, 2010 | 2 comments ]
आपल्या कंपनीत काय सुरू आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला आहे, असा रामभाऊंचा समज होता. कामगारांशी चांगले संबंध ठेवणारा, मनमिळाऊ आणि दिलदार मालक अशी रामभाऊंची प्रतिमा. तथापि, वाडवडिलांच्या काळापासून सुरू असलेला व्यवसाय सांभाळणे एवढेच काम ते आजपर्यंत करीत आले. त्यांच्यात उपजतच उत्तम नेतृत्वगुण होते; परंतु काळानुसार ते बदलले नाहीत. नव्या तंत्रज्ञानापासून ते सतत दूर राहिले. त्यामुळे कंपनीतील व्यवहारांची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोचत नाहीये, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. आणि शेवटी व्हायचे तेच झाले. कंपनीतीलच काही जणांनी रामभाऊंची फसवणूक केली.

रामभाऊ हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी प्रत्यक्षात अशा कित्येक घटना जागतिक पातळीवर घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे उत्तम नेतृत्वगुणांचा नसलेली तंत्रज्ञानाची साथ. "एन्रॉन'च्या अधोगतीस हेच प्रमुख कारण होते, असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला आहे. याउलट "सिटीग्रुप'चे निवृत्त "सीईओ' सॅंडी वेल यांनी आयुष्यात एकही ई-मेल केला नाही, तरीदेखील त्यांनी कंपनीची धुरा यशस्वीरीत्या उचलली. याचा अर्थ असा होतो की बुद्धिमान नेत्यांना कंपनी चालविण्यासाठी कशाचाही आधार लागत नाही; मात्र भविष्यातील नेत्यांना तंत्रज्ञानापासून दूर राहणे परवडणारे नाही. नेटवर्किंग आणि हार्डवेअर क्षेत्रातील आघाडीच्या "सिस्को' या कंपनीचे "सीईओ' आणि अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी एका अमेरिकन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत याच विषयावर भाष्य केले आहे.

जॉन चेंबर्स म्हणतातः कंपनीच्या प्रगतीकरिता एखाद्या तंत्रज्ञानाचा कल्पकतेने कसा वापर करता येईल याचा विचार भविष्यातील "सीईओ' किंवा अध्यक्षाने करायला हवा. आजकाल अनेकांना नवी गॅजेट्‌स आवडतात. मीही त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. परंतु तंत्रज्ञान हे त्याहीपलीकडे असते, याचा विचार करायला हवा. ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्याची भाषा बोलणारे अनेक जण त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत हे सांगू शकत नाही. खुद्द "वॉलमार्ट'च्या उच्चाधिकाऱ्यांकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे केवळ "गॅजेट-लव्हर्स' उपयोगाचे नाहीत. भविष्याचा वेध घेऊन तंत्रज्ञानाच्या साह्याने ती मजल कशी पूर्ण करता येईल, याचा अंदाज असणारे नेतृत्व आज हवे आहे.

तंत्रज्ञान शिकायला वयाची अट नाही, असे जॉन चेंबर्स यांचे स्पष्ट म्हणणे आहे. ते म्हणतात, ""माझे वडील डॉक्‍टर होते. निवृत्त होईपर्यंत त्यांनी कॉम्प्युटरला हात देखील लावला नव्हता. त्यानंतर त्यांना कॉम्प्युटर आणि इंटरनेटबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी ते शिकूनही घेतले. आज ते उत्तम "ऑनलाइन ट्रेडिंग' करतात. शिवाय एखादा शेअर कमी किमतीला कसा विकत घ्यायचा याचे ठोकताळेही त्यांनी आत्मसात केले आहेत. हे कसे शक्‍य झाले? त्यामुळे आज जे "सीईओ' किंवा अध्यक्ष वयाच्या पन्नाशीत आहेत, त्यांनीदेखील या गोष्टी शिकून घ्याव्यात. "रन अवे फ्रॉम टेक्‍नॉलॉजी' हे "हाऊ टू किल युवर करिअर?' या प्रश्‍नाच्या पाच संभाव्य उत्तरांपैकी एक आहे.''

"सिस्को'सारख्या कंपनीचे नेतृत्व करणारे जॉन चेंबर्स "सिस्को'चे वर्णन करताना म्हणतात, ""सिस्को नेमकी कशाची कंपनी आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सर्वसामान्य नागरिकांना वाटते की ही "प्लंबिंग'शी संबंधित कंपनी आहे. मलाही तेच वाटतं. आम्ही "इंटरनेट प्लंबिंग'चेच काम करतो.'' जॉन चेंबर्स यांचे हे उत्तर मिस्कील वाटले तरी, यात नव्या दमाच्या नेतृत्वाला दिलेला सल्ला दडला आहे. आपल्या नेतृत्वगुणाला उजाळा द्यायचा असेल तर "टेक्‍नॉलॉजी'ला दूर ढकलू नका.

(वि.सू.ः इंटरनेटवर आपल्या नावाने काढलेल्या नव्या खात्याचे यूजरनेम Leadership असे आहे; आणि त्याचा पासवर्ड अर्थात technology हा आहे.)
Read the full story »