,

नाऊ प्लेईंग ः चिवचिवाट डॉट एमपीथ्री

January 13, 2010 Leave a Comment

भूतकाळ :
पु. लं.च्या "म्हैस' या प्रकरणातील पहाटेचा प्रसंग. पाचाची एष्टी साताला निघाली, असा उल्लेख करण्यापूर्वी एष्टीतील वातावरणाचं केलेलं फक्कड वर्णन. विविध वयोगटातील स्त्री-पुरुष एष्टीसारख्या वाहनात एकत्र आल्यानंतर जे काही होते त्याला मराठीत "गोंगाट' असे म्हणतात.
---
वर्तमानकाळ :
गणपती विसर्जनाचा दिवस. पुण्यनगरीतल्या लक्ष्मी रस्त्याचा परिसर. मिरवणुकीत समाविष्ट होण्यासाठी मंडळांत लागलेली चुरस आणि वातावरण दुमदुमून टाकणारा आवाज. आवाज कसला तो? त्याला मराठीत कानठळ्या बसणारा आवाज असे म्हणतात.
---
भविष्यकाळ :
रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकींच्या तोडीस आकाशातील विमानांची संख्याही वाढणार. एका मिनिटाला दोन विमाने सुटून दोन लॅंड होणार. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक सुरू झाल्यास ऐकू येणार तो डोकं बधिर करणारा आवाज!
---

पण एवढा कोलाहल आजही आहे, असे तुम्हाला पदोपदी जाणवत असेल. एसटी बस सोडली तरी कोणत्याही खासगी बसमध्ये (अगदी एसीसुद्घा) एक तर मोठ्या आवाजात चित्रपट लावलेला असतो किंवा एसीचा तरी आवाज सुरू असतो. लांबच्या प्रवासात शांतपणे गाणी ऐकावी तरी बाहेरचा आवाज एवढा मोठा असतो किंवा शेजारचा एखादा प्रवासी मोबाईलवर एवढ्या मोठ्याने बोलत असतो, की आपल्या एमपीथ्री प्लेअरचा किंवा वॉकमनचा आवाज आणखी मोठा करता आला असता तर बरे झाले असते, असे वाटायला लागते. पण डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार, बाहेरचा आवाज दाबण्यासाठी वॉकमनचा आवाज वाढविणे अयोग्य आहे. असे केल्याने तुमच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हेडफोन काढल्यानंतरही कानांत गाण्याचा आवाज घुमत असेल तर तुमच्या कानाला धोका आहे, असे समजा. अशा दुहेरी अडचणीत बाहेरील आवाजाचा कसलाही त्रास होऊ न देता गाण्यांचा निखळ आनंद देणारे "आरोग्यवर्धक' हेडफोन मिळाले तर?

सोनी, बोस आणि इतर काही कंपन्यांनी ग्राहकांना सतावणाऱ्या या प्रश्‍नावर उत्तर म्हणून "नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स' बाजारात आणले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच बाजारात आलेल्या या हेडफोन्सना सतत प्रवास करणाऱ्या ग्राहकांनीही पसंती दिली आहे. या हेडफोन्सवर दोन सूक्ष्म मायक्रोफोन बसविलेले आहेत. समजा तुम्ही ट्रेनने प्रवास करीत आहात. तुमचे सहप्रवासी मोठ्या आवाजात गप्पा मारीत आहेत. खिडकी उघडी असल्याने बाहेरचे आवाज आणि ट्रेनचा खडखडाटही स्पष्ट ऐकू येतोय. अशा परिस्थितीत तुम्ही "नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स' वापरले तर त्यास बसविलेले सूक्ष्म मायक्रोफोन्स आधी हा बाहेरील आवाज टिपतात. तो तुमच्या कानांत शिरण्याच्या आत टिपला जातो. हा आवाज एका इलेक्‍ट्रॉनिक सर्किटमध्ये वळवून त्यातील पॉझिटिव्ह वेव्ह्‌ज निगेटिव्ह केल्या जातात. थोडक्‍यात, त्या आवाजाची तीव्रता पाच असेल तर ती शून्याच्या खाली नेली जाते आणि तुम्हाला काही समजण्याच्या आता तो आवाज तुम्ही जे गाणे ऐकत असाल त्यात मिसळला जातो. परंतु त्याची तीव्रता कमी झाल्याने तो तुम्हाला ऐकूदेखील येत नाही. त्यामुळे तुम्ही श्रेया घोषालच्या आवाजातील पल...पल...पल...पल हर पल हर पल...तेवढ्याच गोडव्यासह ऐकू शकता.

प्रश्‍न राहतो तो अशा हेडफोन्सची गरज भासण्याचा. ध्वनिप्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता भविष्यकाळात सर्वांनाच अशा प्रकारचे हेडफोन घालून फिरण्याची वेळ येईल असे वाटणे साहजिक आहे. मात्र अशी वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करणे हे आपल्याच हातात आहे. ट्रॅफिक जाम असताना आणि आपल्या समोरील वाहनचालक एक सेंटिमीटरदेखील पुढे-मागे सरकू शकत नाही हे माहीत असताना हॉर्न वाजविणे, रात्री-अपरात्री फटाके फोडणे, चार कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अख्ख्या कॉलनीला ढोल-ताशे ऐकविणे, कारण नसताना मोबाईलवर मोठ्याने बोलणे, आदी बाबी टाळता येऊ शकतात. कुछ मिनटों की तो बात है, आम्ही काय रोज जिंकतो का, अशी कारणे देणे सोपे आहे; पण कानाला सतत हेडफोन लावून फिरण्याची वेळ आली तर चिमण्यांचा चिवचिवाट आणि कोंबड्याचा आरवदेखील "एमपीथ्री' फॉरमॅटमध्ये ऐकावा लागेल...तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

Related Posts :



1 comments »

  • Learn Digital Marketing said:  

    very informative post for me as I am always looking for new content that can help me and my knowledge grow better.