, , ,

िवसरभोळ्यांसाठी ‘इज ड्यू अॉन’!

August 5, 2009 1 comments

बिलं ही विसरण्यासाठीच असतात, असं म्हटलं तर कुणाला आश्चर्य वाटू नये. एखादी व्यक्ती नित्यनेमाने, अगदी वेळेच्या आत, कोणताही दंड न बसता बिल भरत असेल तर त्याला ‘चमन’ म्हणून हिणवण्यास आपण मागे-पुढे पाहणार नाही. पण काहीही असलं तरी बिलं वेळेवर भरायलाच हवीत. अन्यथा दंड किंवा कनेक्शन तोडण्यासारख्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे बिलांच्या ड्यू डेट्स लक्षात राहतील, याची काळजी घ्या आणि सर्व बिलं वेळेवर भरत जा. आता तुम्ही म्हणाल, तोच तर मुख्य प्रॉब्लेम आहे. बिलांच्या शेवटच्या तारखाच बोंबलायला लक्षात राहत नाहीत. आज बिल भरूया, असा विचार ज्या दिवशी मनात येतो त्याच्या एक दिवस आधीच शेवटची तारीख निघून गेलेली असते. अशा वेळी तुम्ही ‘इज ड्यू अॉन’ ही सेवा वापरू शकता.

मुंबईतल्या ‘युकॉनॉमिक्स’ या कंपनीने सुरू केलेली ही वेब-बेस्ड सेवा अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. म्हणजे, याचा इंटरफेस फारसा आकर्षक नाही; पण सेवा मात्र उपयोगाची आहे. ‘इज ड्यू अॉन’चा वापर करून तुम्ही जाणाऱ्या किंवा येणाऱ्या रकमेचे अलर्ट ई-मेलवर मिळवू शकता. वीज बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, क्रेडिट कार्ड बिल, इंटरनेट बिल, मुलांची फी, घरभाडे, सोसायटी मेन्टेनन्स, इन्शुरन्स प्रीमियम, येणारे चेक्स आदी गोष्टींचा ट्रॅक ठेवणे सोपे होते. ड्यू डेटच्या तीन दिवस आधी तुम्हाला पहिला अलर्ट ई-मेल पाठवला जातो. त्यावर कोणतीही अॅक्शन न घेतल्यास ड्यू डेटपर्यंत दररोज अलर्ट ई-मेल पाठवला जातो. दरम्यान तुम्ही बिल भरले असल्यास तुमच्या अकाऊंटमधून बिलाचा तपशील काढू शकता किंवा पुढच्या महिन्यासाठी अथवा वर्षासाठी पुन्हा अलर्ट सेट करू शकता.





‘इज ड्यू अॉन’चे मोफत व्हर्जन सध्या उपलब्ध असून प्रीमियम व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार असल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. ड्यू डेट अलर्ट पाठवण्यासाठी सध्या केवळ ई-मेलचा वापर केला जातो. भविष्यात एसएमएस आणि ट्विटरवरूनही अपडेट पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बिलांच्या बाबतीत १०० पैकी ९९ लोक विसरभोळे असतात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अशा साऱ्या विसरभोळ्यांसाठीच ‘इज ड्यू अॉन’ ही सेवा खास तयार करण्यात आली आहे.
Read the full story