,

तीन निकामी टॉर्च आणि चार डझन पेन्सिल सेल...

January 1, 2010 Leave a Comment

नव्वदच्या दशकातील कॉम्प्युटरचा सांगाडा, फूड प्रोसेसर आल्यामुळे बाजूला पडलेले मिक्‍सर, 29 इंची टीव्हीमुळे जाळी खात पडलेला जुना 20 इंची टीव्ही, जुन्या काळातील रेडियो, एक टेपरेकॉर्डर, दोन वॉकमन, पन्नास एक ऑडियो कॅसेट, इलेक्‍ट्रिकचा तवा, खराब झालेले इलेक्‍ट्रिक शेव्हर, इलेक्‍ट्रॉनिक खेळणी, तीन निकामी टॉर्च, आणि चार डझन पेन्सिल सेल...

हे कुठल्या भंगारवाल्याच्या दुकानाचे वर्णन नव्हे; तर एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करणाऱ्या प्रकाशच्या घराचे वर्णन आहे. प्रकाश आणि दीपा - दोघांनाही स्वच्छतेचे भयंकर वेड. प्रकाशला तर धुळीची ऍलर्जीच आहे. त्यामुळे घर कसे अगदी स्वच्छ असते (?). आता तुम्ही म्हणाल मग प्रकाशच्या घरात एवढा कचरा कसा काय असू शकतो? आणि असला तरी तो आता कसा काय सापडला? प्रकाशने शहराच्या नव्या भागात एक प्रशस्त फ्लॅट घेतलाय आणि पुढच्या आठवड्यात हे कुटुंब तिथे राहायला जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या "वन बीएचके'तून सामान हलविण्याची तयारी सुरू आहे. सामान बांधताना त्यांना या साऱ्या गोष्टी आढळल्या.

प्रकाश आणि दीपासारखा अनुभव अनेकांना आला असेल. अडगळीतील वस्तूंकडे लक्ष न दिल्यास तो कचरा वाढत जातो आणि अडगळ इलेक्‍ट्रिक किंवा इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची असेल तर मग विचारायलाच नको. या वस्तू ठेवण्यासारख्या नसतात आणि त्या टाकून देण्याची हिंमतही होत नाही. त्यांच्यासोबत कुठेतरी भावना जडलेल्या असतात. पहिल्या कमाईचा टीव्ही, लग्नानंतरची पहिली खरेदी, मुलाची पहिली खेळणी वगैरे वगैरे. तथापि, अडगळीतल्या या वस्तू किती धोकादायक असू शकतात याचा विचार केला पाहिजे. टीव्ही किंवा कॉम्प्युटरच्या पिक्‍चर ट्यूबमध्ये लेड, बॅरियम, कॅडमियम आणि फॉस्फरससारखे विषारी घटक असतात. अनवधानाने ट्यूब फुटून हे घटक बाहेर आले तर त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.

इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये प्रचंड वेगाने बदल होत असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते. अशा वस्तू अनेक वर्षे वापरल्यानंतरही तशाच ठेवल्या तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे आपण पाहिलेच. म्हणून अशा वस्तूंमध्ये जास्त काळ अडकून पडू नये. अमेरिका किंवा ब्रिटनसारख्या विकसित देशांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या वापराचे प्रमाण अधिक असल्यामुळे "रिसायकलिंग' ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया बनली आहे. 2004 मध्ये एकट्या अमेरिकेत सुमारे 30 कोटी कॉम्प्युटर्स अडगळीत टाकून दिल्याचे आढळून आले होते. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू अडगळीत टाकून देण्याचा दर वाढतोच आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अमेरिकेत "रिसायकलिंग' करून देणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या. घरातील किंवा संस्थांमधील इलेक्‍ट्रॉनिक अडगळ अशा संस्थांकडे दिली की सर्वप्रथम "डाटा रिकव्हरी' केली जाते. कंपनीकडे आलेल्या प्रत्येक वस्तूची इत्थंभूत माहिती नोंदवून त्यानंतर त्यातील डाटा नष्ट केला जातो. त्यावर लावलेली लेबल्स काढली जातात. त्यापैकी काही वस्तू किंवा सुटे भाग पुनर्वापरास योग्य असतील तर त्यांची विक्री केली जाते. काही इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमध्ये सोने आणि चांदीचे अंश असतात. ते काढल्यानंतर शास्त्रोक्त पद्घतीने आणि पर्यावरणास कोणतीही हानी पोचणार नाही याची काळजी घेत उपकरणांची विल्हेवाट लावली जाते.

तुम्ही म्हणाल, अमेरिकेचं ठीक आहे; पण भारतातील अनेक घरांत कॉम्प्युटर अजून पोचलेलासुद्घा नाही. तेव्हा "रिसायकलिंग'ची गरजच काय? असे असले तरी आपल्याकडील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे आणि वापराचे प्रमाण पाहिल्यास भारतास "टेक्‍नॉलॉजी रिसायकलिंग'ची गरज खूप अगोदर भासणार आहे. असंघटित उत्पादकांमार्फत तयार केलेल्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचे प्रमाण अधिक असल्यामुळे अशा वस्तूंच्या आयुष्याची हमी देता येत नाही. शिवाय, स्वस्त असल्यामुळे अनेक लोकांची पसंती मिळते आणि अशा वस्तूंचा प्रत्येक घरात शिरकाव होतो आणि कालांतराने त्या अडगळीत पडतात. वाढत्या आयटी आणि बीपीओ कंपन्यांमुळे कॉम्प्युटर, सर्व्हरसारख्या महागड्या वस्तूंचे "रिसायकलिंग' करण्याची वेळही आपल्यावर लवकरच येणार आहे. यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन "टेक्‍नॉलॉजी रिसायकलिंग'ची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. तत्पूर्वी "टेक्‍नॉलॉजी सॅव्हीनेस'बरोबर "टेक्‍नॉलॉजी क्‍लीनलीनेस'ची सवय प्रत्येकाने लावून घेण्यास काय हरकत आहे? नाहीतर एक टेपरेकॉर्डर, दोन वॉकमन, पन्नास एक ऑडियो कॅसेट, इलेक्‍ट्रिकचा तवा, खराब झालेले इलेक्‍ट्रिक शेव्हर, इलेक्‍ट्रॉनिक खेळणी, तीन निकामी टॉर्च आणि चार डझन पेन्सिल सेल...यांची सोबत आहेच!
--
नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या चार महिन्यांत एकही नवी पोस्ट न टाकल्याबद्दल क्षमस्व. आताही रोज पोस्ट टाकता येईल, अशी खात्री नाही; पण प्रयत्न जरूर करेन. दै. सकाळच्या प्रेरणा पुरवणीत मी टेक्नॉलॉजी नावाने एक सदर लिहित असे. त्यातील काही लेख आम्हाला पुन्हा वाचायला आवडतील, अशी मागणी अनेक मित्र-मैत्रिणींनी केल्यामुळे त्यातील काही लेख या ब्लॉगवर पोस्ट करतोय. रोजच्या कामातून वेळ काढून नव्या पोस्ट्स लिहिण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन.
--

Related Posts :



3 comments »

  • राजेंद्र सरंबळकर said:  

    रोजच्या कामातून वेळ काढून नव्या पोस्ट्स लिहिण्याचा प्रयत्न मात्र नक्की कराच.

  • Amit Tekale said:  

    राजेंद्रजी, नक्की प्रयत्न करेन.

  • Learn Digital Marketing said:  

    This is the precise weblog for anybody who needs to seek out out about this topic. You notice so much its almost arduous to argue with you. You positively put a brand new spin on a subject that's been written about for years. Nice stuff, simply nice!