,

मिनिस्टर की सीईओ?

January 2, 2010 Leave a Comment

महिलांनी कृपया लक्ष द्यावे...
खालीलपैकी जी उपकरणे आणि गॅजेट्‌स तुम्हाला सफाईदारपणे हाताळता येतात, त्यांच्यासमोर बरोबर अशी खूण करा.

1. डेस्कटॉप कॉम्प्युटर
2. लॅपटॉप
3. सर्वांत साधा मोबाईल फोन
4. हाय-एन्ड मोबाईल फोन (पीडीए)
5. वॉशिंग मशिन
6. मायक्रोवेव्ह ओव्हन
7. आयपॉड
8. डिश टीव्ही
9. व्हिडीओ गेम
10. फूड प्रोसेसर

"बरोबर'ची किती चिन्हे आली आहेत हे आत्ताच मोजू नका किंवा त्याचा विचारही करू नका. त्यावर आपण लेखाच्या शेवटी चर्चा करू. त्यापूर्वी तुमच्यापैकीच काही जणींच्या वयाच्या या काही महिलांचे "प्रोफाईल्स' वाचा.

कार्लटन ऊर्फ कार्ली फिओरिनाः
ह्युलेट-पॅकार्डच्या (एचपी) माजी अध्यक्षा आणि सीईओ

ह्युलेट-पॅकार्ड किंवा "एचपी' ही कॉम्प्युटर तयार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी. जगातील सर्वोत्तम 500 कंपन्यांच्या यादीत (फॉर्च्युन 500) "एचपी' 13 व्या क्रमांकावर आहे. फिओरिनाचे वडील न्यायाधीश होते आणि आपल्या मुलीनेही हेच करिअर निवडावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु फिओरिनाने इंजिनिअरिंग क्षेत्र निवडले आणि 1980 च्या सुमारास ती "ट्रेनी' म्हणून "एटी अँड टी' या कंपनीत रुजू झाली. विषयाचे संपूर्ण ज्ञान, भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता, नव्या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या जोरावर "एटी अँड टी'मधील ही "ट्रेनी' 1999 मध्ये "एचपी'ची अध्यक्षा झाली. 2002 मध्ये "एचपी'ने 19 अब्ज डॉलर देऊन "कॉम्पॅक' ही कंपनी संपादित केली. या व्यवहारामुळे फिओरिनावर प्रचंड टीका झाली; परंतु तिने उचललेले पाऊल योग्यच होते हे कंपनीला आता लक्षात येत आहे.

मेग व्हिटमन
ई-बे डॉट कॉमच्या अध्यक्षा आणि सीईओ

"वर्ल्डस लार्जेस्ट पर्सनल ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी' असे ई-बेचे वर्णन केले जाते. ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी विश्‍वासार्ह समजली जाणारी ही वेबसाईट मेग व्हिटमन या महिलेच्या अध्यक्षतेखाली चालविली जाते. "फॉर्च्युन' या नियतकालिकातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या "मोस्ट पॉवरफुल विमेन'च्या यादीत मेग तिसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेतली सर्वांत श्रीमंत महिला "सीईओ'चा बहुमानही तिला मिळाला आहे. वैद्यकीय शाखेत करिअर करण्याच्या दृष्टीने एका महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मेगने ते शिक्षण अर्धवट सोडले. तिला अचानक अर्थशास्त्रात रस निर्माण झाला. अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर तिने "हार्वर्ड बिझनेस स्कूल'मधून एमबीए पूर्ण केले आणि तीन-चार कंपन्यांत मार्केटिंगचा अनुभव घेतला. मार्च 1998 मध्ये मेगने "ई-बे'च्या अध्यक्षपद स्वीकारले आणि वेगाने प्रगती करणाऱ्या जगातील मोजक्‍या "डॉट कॉम' कंपन्यांमध्ये "ई-बे'ला नेऊन ठेवले.

ऍन मल्काही
झेरॉक्‍स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ

फोटोकॉपीला समानार्थी म्हणून सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे झेरॉक्‍स! वास्तविक फोटोकॉपिईंगसाठी लागणाऱ्या मशिन्स तयार करणाऱ्या कंपनीचे नाव "झेरॉक्‍स कॉर्पोरेशन' आहे. या कंपनीची अध्यक्षही एक महिलाच आहे. ऍन मल्काही हे त्यांचे नाव. "झेरॉक्‍स कॉर्पोरेशन'मध्ये "सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह' म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या ऍनने 2001 मध्ये संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. काम करण्याचा झपाटा आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर ऍनची व्यावसायिक कारकीर्द वेगाने पुढे सरकत गेली. तिने जेव्हा अध्यक्षपद स्वीकारले त्या वेळी "झेरॉक्‍स'वर कर्जाचे मोठे डोंगर होते. तिने घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे "झेरॉक्‍स'ने पुन्हा उभारी घेतली आणि 2005 मध्ये कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात 9 टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

वाचलीत ही प्रोफाईल्स? आता जरा आपल्या मूळ प्रयोगाकडे वळू. तुम्हाला वाटेल या प्रोफाईल्सचा आणि सुरवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचा काय संबंध? खोलात शिरून विचार केला तर लक्षात येईल, की या सख्या आज जगातील मोठ्या टेक्‍नॉलॉजी कंपनीन्यांची धुरा सांभाळताहेत आणि आपल्याला साधा मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटरपण हाताळता येत नाही? नाराज होऊ नका. स्त्रियांमध्ये उपजतच "मॅनेजमेंट'चे गुण असतात. त्यांना नव्या तंत्रज्ञानाचा आधार दिला तर त्याचा दैनंदिन जीवनात अतिशय चांगल्या पद्घतीने वापर करता येईल. या प्रयोगाचे एकच उद्दिष्ट होतेः घर चालवणे आणि घर उत्तम चालवणे यात मूलभूत फरक आहे. घर उत्तम चालवायचे असेल तर "होम मिनिस्टर' या भूमिकेतून स्त्रियांनी आता "सीईओ'च्या भूमिकेत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या तरुण मुला-मुलीकडून नवे तंत्रज्ञान शिकू शकता आणि आपला "स्कोअर' वाढवू शकता. नवीन वर्षासाठी यापेक्षा एखादा उत्तम संकल्प आहे का तुमच्याकडे?

Related Posts :



3 comments »

  • साळसूद पाचोळा said:  

    स्त्रियांमध्ये उपजतच "मॅनेजमेंट'चे गुण असतात
    .
    .
    हो हो.. हे एकदम पटले..

    डोळ्यात पाणी आणुनही त्या बऱ्याच गोष्टी मैनेज करतात नाहि..

    विनोदाचा भाग सोडा .. छान लिहले आहे. मस्तच....

    .

    आप्ला... साळसूद पाचोळा.

  • Unknown said:  

    छानच लेख आहे आवडला

    -www.vaibhavbhosale.com

  • Amit Tekale said:  

    प्रिय, साळसूद पाचोळा (भन्नाट नाव!) आणि वैभव,
    धन्यवाद. डोळ्यात पाणी आणत असल्या तरी स्त्रियांमध्ये मॅनेजमेंटचे गुण असतात, याबाबत कुणाचेही दुमत असणार नाही. आपल्या आईकडे पाहिलं की याची कल्पना येते...