,

Username: Leadership I Password: **********

January 11, 2010 Leave a Comment

आपल्या कंपनीत काय सुरू आहे याची इत्थंभूत माहिती आपल्याला आहे, असा रामभाऊंचा समज होता. कामगारांशी चांगले संबंध ठेवणारा, मनमिळाऊ आणि दिलदार मालक अशी रामभाऊंची प्रतिमा. तथापि, वाडवडिलांच्या काळापासून सुरू असलेला व्यवसाय सांभाळणे एवढेच काम ते आजपर्यंत करीत आले. त्यांच्यात उपजतच उत्तम नेतृत्वगुण होते; परंतु काळानुसार ते बदलले नाहीत. नव्या तंत्रज्ञानापासून ते सतत दूर राहिले. त्यामुळे कंपनीतील व्यवहारांची अचूक माहिती आपल्यापर्यंत पोचत नाहीये, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. आणि शेवटी व्हायचे तेच झाले. कंपनीतीलच काही जणांनी रामभाऊंची फसवणूक केली.

रामभाऊ हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी प्रत्यक्षात अशा कित्येक घटना जागतिक पातळीवर घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे उत्तम नेतृत्वगुणांचा नसलेली तंत्रज्ञानाची साथ. "एन्रॉन'च्या अधोगतीस हेच प्रमुख कारण होते, असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला आहे. याउलट "सिटीग्रुप'चे निवृत्त "सीईओ' सॅंडी वेल यांनी आयुष्यात एकही ई-मेल केला नाही, तरीदेखील त्यांनी कंपनीची धुरा यशस्वीरीत्या उचलली. याचा अर्थ असा होतो की बुद्धिमान नेत्यांना कंपनी चालविण्यासाठी कशाचाही आधार लागत नाही; मात्र भविष्यातील नेत्यांना तंत्रज्ञानापासून दूर राहणे परवडणारे नाही. नेटवर्किंग आणि हार्डवेअर क्षेत्रातील आघाडीच्या "सिस्को' या कंपनीचे "सीईओ' आणि अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी एका अमेरिकन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत याच विषयावर भाष्य केले आहे.

जॉन चेंबर्स म्हणतातः कंपनीच्या प्रगतीकरिता एखाद्या तंत्रज्ञानाचा कल्पकतेने कसा वापर करता येईल याचा विचार भविष्यातील "सीईओ' किंवा अध्यक्षाने करायला हवा. आजकाल अनेकांना नवी गॅजेट्‌स आवडतात. मीही त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. परंतु तंत्रज्ञान हे त्याहीपलीकडे असते, याचा विचार करायला हवा. ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्याची भाषा बोलणारे अनेक जण त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत हे सांगू शकत नाही. खुद्द "वॉलमार्ट'च्या उच्चाधिकाऱ्यांकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे केवळ "गॅजेट-लव्हर्स' उपयोगाचे नाहीत. भविष्याचा वेध घेऊन तंत्रज्ञानाच्या साह्याने ती मजल कशी पूर्ण करता येईल, याचा अंदाज असणारे नेतृत्व आज हवे आहे.

तंत्रज्ञान शिकायला वयाची अट नाही, असे जॉन चेंबर्स यांचे स्पष्ट म्हणणे आहे. ते म्हणतात, ""माझे वडील डॉक्‍टर होते. निवृत्त होईपर्यंत त्यांनी कॉम्प्युटरला हात देखील लावला नव्हता. त्यानंतर त्यांना कॉम्प्युटर आणि इंटरनेटबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी ते शिकूनही घेतले. आज ते उत्तम "ऑनलाइन ट्रेडिंग' करतात. शिवाय एखादा शेअर कमी किमतीला कसा विकत घ्यायचा याचे ठोकताळेही त्यांनी आत्मसात केले आहेत. हे कसे शक्‍य झाले? त्यामुळे आज जे "सीईओ' किंवा अध्यक्ष वयाच्या पन्नाशीत आहेत, त्यांनीदेखील या गोष्टी शिकून घ्याव्यात. "रन अवे फ्रॉम टेक्‍नॉलॉजी' हे "हाऊ टू किल युवर करिअर?' या प्रश्‍नाच्या पाच संभाव्य उत्तरांपैकी एक आहे.''

"सिस्को'सारख्या कंपनीचे नेतृत्व करणारे जॉन चेंबर्स "सिस्को'चे वर्णन करताना म्हणतात, ""सिस्को नेमकी कशाची कंपनी आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडतो. सर्वसामान्य नागरिकांना वाटते की ही "प्लंबिंग'शी संबंधित कंपनी आहे. मलाही तेच वाटतं. आम्ही "इंटरनेट प्लंबिंग'चेच काम करतो.'' जॉन चेंबर्स यांचे हे उत्तर मिस्कील वाटले तरी, यात नव्या दमाच्या नेतृत्वाला दिलेला सल्ला दडला आहे. आपल्या नेतृत्वगुणाला उजाळा द्यायचा असेल तर "टेक्‍नॉलॉजी'ला दूर ढकलू नका.

(वि.सू.ः इंटरनेटवर आपल्या नावाने काढलेल्या नव्या खात्याचे यूजरनेम Leadership असे आहे; आणि त्याचा पासवर्ड अर्थात technology हा आहे.)

Related Posts :



2 comments »

  • Anonymous said:  

    Such a great post. Its very useful for me. Buy iPhone 5 from The Mobile Store www.themobilestore.in

  • Anonymous said:  

    Great post. Its very useful for me. Buy iPhone 5 from The Mobile Store www.themobilestore.in