,

डिझॉल्व्हिंग बाऊंडरीज...

January 8, 2010 Leave a Comment

"आमचा चिनू ना खूप हुशार आहे. (स्थळ, काळ, वेळ आणि व्यक्ती याचा कसलाही विचार न करता सर्व "हुशार' मुलांचे पालक कोणत्याही वाक्‍याची सुरवात याच ओळीने करतात) परवा कोल्हापूरला जातानाचा प्रसंग. स्वारगेटवर मोकळ्या बसची वाट पाहत मी आणि चिनू उभे होतो. शेजारी एक मनुष्य सिगारेट ओढत होता. त्याच्या धुराने मला त्रास होतोय हे पाहून चिनू त्याच्याकडे गेला आणि वर मान करून म्हणाला - "ओ काका, इथे सिगारेट ओढू नये असा बोर्ड लावलाय. दिसत नाही का तुम्हाला?' इतका अभिमान वाटला म्हणून सांगू त्याचा! आई-वडिलांचे चांगले गुण मुलात येतात ते काही खोटं नाही.' आठ वर्षांच्या चिनूचे (आणि त्याच्या आई-वडिलांचे) तुम्ही पण कौतुक कराल. पण आठव्या वर्षी चिनूत एवढा समजूतदारपणा कसा काय आला, त्याला "आदर्श नागरिका'ची कर्तव्ये कशी काय उमगली, हे प्रश्‍न तुम्हाला पडले असतील. चिनूची गोष्ट ही काल्पनिक होती. पण "डिझॉल्व्हिंग बाऊंडरीज थ्रू टेक्‍नॉलॉजी' या प्रकल्पांतर्गत शाळांमधील प्रत्येक जण चिनूसारखा समजूतदार होतो, असा अनुभव आहे.

"डिझॉल्व्हिंग बाऊंडरीज थ्रू टेक्‍नॉलॉजी' या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली ना? आयर्लंडमध्ये 1998-99 मध्ये सुरू झालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज तेथील शेकडो शाळांपर्यंत पोचला आहे. एखाद्या मुलाला बालवाडीत टाकले की त्याच शाळेतून तो दहावी पास होऊन बाहेर पडतो. स्पर्धात्मक वातावरणामुळे इतर शाळांकडे आणि त्यातील विद्यार्थ्यांकडे स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते. दुसऱ्या शाळेकडून आणि विद्यार्थ्यांकडून आपण खूप काही शिकू शकतो, याचा विचार शिक्षक आणि पालक करत नाहीत. "डिझॉल्व्हिंग बाऊंडरीज थ्रू टेक्‍नॉलॉजी' या प्रकल्पाद्वारे दोन शाळांमध्ये सहकार्याची भावना निर्माण केली जाते. शक्‍य असेल तर दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची गटा-गटाने प्रत्यक्ष भेट घडवून आणली जाते; अन्यथा दोन शाळांतील विद्यार्थ्यांची "व्हीडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे भेट घडवली जाते. या भेटींचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलेले असते. विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडविली जाते. अबोल विद्यार्थ्यासही चर्चेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. वयोगटानुसार भेटीचे उद्दिष्ट वेगळे असते. उदा. 6 वर्षांच्या मुलांना चित्रं काढा, प्राणी ओळखा, कुठला प्राणी आवडतो ते सांगा - असे विषय दिले जातात. चिनूच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना पाच "सी'ज्‌चे महत्त्व पटवून दिले जाते. हे पाच "सी' म्हणजे - कंट्री, सिटिझनशिप, सिटी, कलर आणि कॉन्ट्रास्ट. सोप्या भाषेत मुलांना प्रश्‍न विचारले जातात. त्यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांना देशाचे महत्त्व पटवून दिले जाते. आपल्या देशाची त्यांना कितपत माहिती आहे, हे समजून घेतले जाते. आपण ज्या शहरात राहतो त्याची भौगोलिक आणि सामाजिक माहिती विद्यार्थीच एकमेकांशी "शेअर' करतात. चिनूसारखी धिटाई प्रत्येकात निर्माण करण्यासाठी बारकाईने अभ्यास करून चर्चेचे विषय निवडले जातात.

जसे - सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढू नये, असा नियम असताना एखादी व्यक्ती सिगारेट ओढत असेल तर तुम्ही काय कराल? अशी चर्चा घडविल्याने मुलांना दिशा मिळते. आदर्श नागरिकाची कर्तव्ये मुलांच्या मनावर बिंबविण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चांगला पर्याय असू शकेल? वर्णभेद, जातिभेद यांसारखे विषयही "डिझॉल्व्हिंग बाऊंडरीज थ्रू टेक्‍नॉलॉजी' या प्रकल्पातील तज्ज्ञ अतिशय संयमाने हाताळतात. समाजाच्या दोन स्तरांतील भिन्नतादेखील मुलांनी समजावून घ्यावी आणि त्यावर आपले मत बनवावे, अशा पद्धतीने काही चर्चा घडविल्या जातात. हे सगळे प्रशिक्षण खेळीमेळीच्या वातावरणात आणि "व्हीडीओ कॉन्फरन्सिंग'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सान्निध्यात होत असल्याने, मुलांना कोणतेही दडपण येत नाही.
या सर्व प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने मुलांना नवे तंत्रज्ञान समजून घेणेही सोपे जाते. त्याची गोडी लागते. शिवाय अतिशय सोप्या पद्घतीने पाच "सीं'चे (विसरलात का?) आकलनही होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्ञानार्जनाच्या आड येणाऱ्या भिंती मोडणे किती सोपे असते, याची प्रचिती अनुकरण केल्याशिवाय येणार नाही. तुमच्या मनात आलेला विचार सफल होवो, यासाठी शुभेच्छा!

Related Posts :0 comments »