,

तुमच्याकडे आहे का म्युझिक लॉकर?

June 11, 2008 Leave a Comment

आयपॉड सोबत असताना आपल्याला इतर गोष्टींची फारशी गरज भासत नाही. आपण आणि आपला आयपॉड. आयपॉड किंवा इतर एमपीथ्री प्लेयर्सही आजकाल अगदी ५१२ एमबीपासून ८० जीबीपर्यंतचे मिळतात. त्यामुळे यात कमी गाणी बसतात, वगैरे कारणांनाही जागा उरत नाही. आता प्रश्न येतो तो आपल्या आवडत्या गाण्यांचा. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला जी गाणी आवडतात ती आपल्या लॅपटॉपवरही असतात, अॉफिसमधल्या किंवा घरातल्या डेस्कटॉपवरही असतात, आपल्या आयपॉडवरही असतात, गाडीतल्या सीडीतही असतात आणि त्यातलं अतिशय अावडतं एखादं गाणं आपल्या मोबाईलमध्येही असतं. अशाप्रकारे एकाच गाण्याच्या आपण चार-पाच कॉपीज करून ठेवतो आणि मौल्यवान मेमरी वाया घालवतो. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहित असेल, की अशावेळी आपण आपली आवडती गाणी इंटरनेटवर साठवून ठेवू शकतो. ही गाणी अॉनलाईन एमपीथ्री प्लेयर्सच्या साह्याने एेकताही येतात. एवढंच नव्हे तर, इंटरनेटवरूनच आपण ही गाणी अॉनलाईन प्लेयरवर अपलोडही करू शकतो. म्हणजे गाण्याची फाईल तुमच्या डेस्कटॉपवर डाऊनलोड करण्याची गरजही उरत नाही. अशा अनेक सेवा आहेत. त्यातील एक सेवा म्हणजे

एमपीथ्रीट्यून्स डॉट कॉम. यातील लॉकर फॅसिलिटीचा वापर करून तुम्ही सुमारे २५ जीबी क्षमतेची गाणी अॉनलाईन स्टोअर करू शकता. ही गाणी तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमधून एेकू शकता. त्यासाठी एखादे विशिष्ट प्लेयर असणेही बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या आयट्यून्समध्ये असलेली सर्व गाणी किंवा विशिष्ट प्लेलिस्ट्स एमपीथ्रीट्यून्ससोबत सिंक्रोनाईझ करू शकता.

त्यासाठी तुम्हाला याच साईटवरून लॉकरसिंक नावाचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. या सेवेतील मला सर्वाधिक आवडलेले फीचर म्हणजे वेबलोड. यातून तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेले एखादे गाणे थेट तुमच्या लॉकरमध्ये अपलोड करू शकता. यासाठी ते गाणं जिथे होस्ट केलेले आहे त्याची लिंक देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी एमपीथ्रीट्यून्सनेच इंटरनेट एक्सप्लोरर आणि फायरफॉक्ससाठी साईडलोड नावाचे प्लग-इन विकसित केले आहे. तुम्ही एखाद्या म्युझिक साईटवर असाल तर या प्लगइनमुळे त्या साईटवर उपलब्ध असलेल्या सर्व गाण्यांच्या लिंक्स तुम्हाला दिसतील आणि त्यावर क्लिक केलं की ती गाणी तुमच्या लॉकरमध्ये स्टोअर होतील.
एमपीथ्रीट्यून्ससारख्या अनेक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील काही सेवांबद्दल आगामी काही पोस्टमध्ये मी माहिती देईन.

Related Posts :



0 comments »