,

रॅम एक्स्प्रेस - भाग २

August 1, 2008 Leave a Comment


अॅप्लीकेशन्सची संख्या वाढली की आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप धापा टाकायला लागतो. अॅडोबचे एखादे अॅप्लीकेशन (विशेषतः फोटोशॉप किंवा ड्रीमवीव्हर) क्लिक करून ओपन होईपर्यंत आपण एक कप चहा तयार करून घेऊ शकतो. रॅम म्हणजे काय चीज असते, हे त्यावेळी आपल्याला कळतं. त्यामुळे एखाद्याने नवा लॅपटॉप घेतला आणि त्याची रॅम २ जीबी आहे असं कळलं की अस्वस्थ व्हायला लागतं - कारण आपण ५१२ एमबीवर कामाचा गाडा ओढत असतो. विंडोज व्हिस्टा वापरणाऱ्यांना रेडीबुस्ट या फीचरमुळे रॅमच्या कटकटीतून मुक्ती मिळाली आहे. या अॅप्लीकेशनचा वापर करून व्हिस्टाचे ग्राहक साधा पेनड्राईव्ह वापरून रॅम बूस्ट करू शकतात. पण रेडीबुस्ट हे फक्त व्हिस्टासाठी आहे. एक्सपी वापरणाऱ्यांचे काय?

रेडीबुस्टच्याच धतर्तीवर तयार केलेले ईबुस्टर हे अॅप्लीकेशन एक्सपीसाठी रॅम बुस्टर म्हणून वापरता येऊ शकते. पेनड्राईव्हमधील फ्लॅश मेमरी वापरून तुमच्या मशीनची स्पीड वाढविण्याचे काम ईबुस्टरद्वारे केले जाते. रेडीबुस्टचा एक तोटा म्हणजे त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पेनड्राईव्ह्जची गरज असते. ईबुस्टरसाठी तुम्ही कोणताही साधारण पेनड्राईव्ह वापरू शकता. इतकेच नव्हे तर, डिजिटल कॅमेरा आणि मोबाईल फोनमध्ये वापरले जाणारे फ्लॅश मेमरी कार्डही (CF, SD/SDHC, MMC, xD, इ.) तसेच एक्स्टर्नल हार्ड डिस्कही यासाठी वापरता येते. नेहमी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लीकेशन्सच्या आकडेवारीचे विश्लेषण ईबुस्टरद्वारे केले जाते. या आकडेवारीच्या आधारे सदर अॅप्लीकेशन ओपन करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या फाईल्स कॅश मेमरीत ठेवल्या जातात. त्यामुळे अॅप्लीकेशन ओपन होताना लागणारा वेळ वाचतो. यामुळे मशीन बूट होण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही लक्षणीय घट होते.



ईबुस्टरचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एकावेळी चार एक्स्टर्नल डिव्हायसेस वापरून रॅम बूस्ट करू शकता. आणि प्रत्येक डिव्हाईसवर ४ जीबीपर्यंत कॅश मेमरी राहू शकते.
ईबुस्टर हे पेड अॅप्लीकेशन असले तरी ट्रायल व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ते अनंत काळासाठी वापरू शकता. एकदा मशीन बूट केल्यानंतर केवळ चार तास हे अॅप्लीकेशन वापरता येते. म्हणजे दिवसातून केवळ एकदा रिस्टार्ट करून तुम्ही अॉफिसमध्ये हे अॅप्लीकेशन वापरू शकता. तेव्हा वाट न बघता ईबुस्टर डाऊनलोड करा. आणि तुमच्या २५६, ५१२ एमबीच्या मशीनला समुद्र पार करण्यासाठी या नव्या ‘रॅम’सेतूचा आधार द्या.

रॅम बुस्ट करण्यासाठी आणखी एक ट्रिक, वाचाः रॅम एक्स्प्रेस

Related Posts :



0 comments »