,

टिनआयः अॉनलाईन इमेजेसचा बिग बॉस!

August 28, 2008 Leave a Commentमध्यंतरी गोव्यातल्या एका ब्लॉगरने भारतीय तसेच परदेशी माध्यमांच्या अकलेचं चांगलंच दिवाळं काढलं होतं. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या देण्याची इतकी चढाओढ लागलेली अाहे की जणू यांना उसेन बोल्टचा विश्वविक्रमंच मोडायचा आहे, असे वाटते. यांची ही खोड मोडून काढण्यासाठी पेनप्रिक्स हा ब्लॉग चालवणाऱ्यांनी अगदी खरी वाटेल अशी एक बातमी प्लॅंट केली आणि ती काही निवडक प्रसारमाध्यमांकडे पाठवली. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ती तशीच्या तशी छापली. लोकल वाटणारी ही बातमी पाहता पाहता नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावरदेखील जाऊन पोचली आणि मग प्रसारमाध्यमांना आपली चूक कळली. पण तोवर ‘बूंद से गयी...’ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यानंतर पेनप्रिक्सने ती बातमी कशी तयार केली, त्यासाठी कुठली माहिती वापरली, कोणते फोटो वापरले वगैरे बाबींबद्दल ब्लॉगवर सविस्तर पोस्ट लिहिली. एखादी बाब तपासून पाहताना आपण सर्वप्रथम त्यातील तथ्यांची खातरजमा करतो. माहितीत काही फेरफार केला असल्यास आपल्या लक्षात येण्याची शक्यता अधिक असते, पण फोटोमध्ये काही गोंधळ असल्यास ते सहसा ध्यानात येत नाही किंवा आल्यास खातरजमा करण्यात अडचणी येतात. उदा. पेनप्रिक्सने पाठवलेल्या फोटोतील व्यक्ती ही योहान बाशंच आहे, हे कसं ओळखणार?

टिनआय ही सेवा वापरून तुम्ही रिव्हर्स फोटो सर्च देऊ शकता. म्हणजे गुगल इमेज सर्च वापरून आपण हिलरी क्लिंटनचे शेकडो फोटो मिळवू शकतो. पण ज्यावेळी फोटोतील अॉब्जेक्टबद्दल माहिती हवी असते त्यावेळी आपल्याकडे अंदाज बांधण्याखेरीज दुसरा कोणताही पयर्याय नसतो. अशा वेळी टिनआय कामास येऊ शकते. टिनआय च्या आधारे तुम्ही एखादा फोटो अपलोड करून तो इंटरनेटच्या मायाजालात कुठे आणि कसा वापरला आहे याची माहिती मिळवू शकता. उदा. पेनप्रिक्सने वापरलेला योहान बाशचा फोटो अपलोड केल्यास तो बाश आहे याची कुठेच माहिती मिळत नाही. ओल्ड मॅन अशा नावाने दोन-तीन साईट्सवर संबंधित फोटो वापरला गेला आहे. यावरून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.हा झाला टिनआयचा एक फायदा. याचा दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही जर फोटोग्राफर किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असाल तर तुमचे फोटो किंवा इतर आर्टवर्क तुमच्या परवानगीशिवाय इतर कुठे व्यावसायिक कामासाठी वापरले जात अाहे किंवा कसे, याची माहितीही तुम्हाला मिळू शकते. यासाठी टिनआयतर्फे sophisticated pattern recognition algorithm ही प्रणाली वापरली जाते. यात प्रत्येक फोटोचे पिक्सेल-बाय-पिक्सेल विश्लेषण करून बोटांच्या ठशाप्रमाणे एक विशिष्ट आकृती तयार केली जाते. या आकृतीशी मिळती-जुळती आकृती इंटरनेटवर शोधली जाते. त्यामुळे तुम्ही अपलोड केलेला फोटो इतर कुठल्या फोटोशी जुळत असल्यास तो १०० टक्के टिनआयच्या रिझल्ट्समध्ये दिसतो. तो तुमच्या मूळ फोटोशी कितपत जुळतो हेही तुम्ही कम्पेअर करू शकता. क्रॉप केलेले, मिक्स केलेले किंवा करेक्शन केलेले फोटोही टिनआयच्या नजरेतून सुटत नाहीत.
टिनआयचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे.

Related Posts :0 comments »