,

िवझो ः एक स्पेशल पर्पज ब्राऊजर

June 17, 2009 Leave a Comment

सर्वसामान्य इंटरनेट युजरला इंटरनेट एक्स्प्लोअररपलीकडे कुठले ब्राऊजर असते, याची कल्पनाच नसते. e असं लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक केलं की इंटरनेट सुरू होतं, अशी अनेकांची समजूत असते. पण या ब्राऊजरच्या विश्वात प्रचंड मारामारी सुरू असते, याची कल्पना तुम्हाला असेलंच. या ब्राऊजरचा प्रवास मात्र अतिशय रंजक आहे. आज इंटरनेट एक्प्लोअरर पाठोपाठ फायरफॉक्स, सफारी, अॉपेरा, क्रोमसारखे ब्राऊजर्सही वापरले जातात. पण यापुढे जाऊन केवळ सोशल नेटवर्किंगसाठी तयार केलेले फ्लॉकसारखे ब्राऊजर्सही ठराविक लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आज आपण अशाच एका ‘स्पेशल पर्पज ब्राऊजर’ची माहिती घेणार आहोत.

ब्रिटनमधील 'रॅडिकल सॉफ्ट' या कंपनीने मोझिला फायरफॉक्सचाच आधार घेत 'विझो' हे स्पेशल पर्पज ब्राऊजर विकसित केले. हळू-हळू विकसित होत या ब्राऊजरचे अॅडव्हान्स्ड व्हर्जन (विझो ३) आता उपलब्ध झाले आहे. या ब्राऊजरमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्समध्ये आहेतच; असं प्रथमदर्शनी तुम्हाला वाटू शकतं. एका अर्थाने ते खरंही आहे; पण या ब्राऊजरची उद्दिष्टं वेगळी आहेत. फास्टर डाऊनलोड्स आणि स्मार्टर ब्राऊजिंगसाठी तयार केलेले ब्राऊजर, अशी विझोची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.एखादी फाईल डाऊनलोड करताना मूळ सर्व्हरशी मल्टिपल कनेक्शन्स एस्टॅब्लिश करून विझो डाऊनलोडचा स्पीड १० पटीने वाढवते. यामुळे डाऊनलोडिंगमध्ये जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. या ब्राऊजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इनबिल्ट टोरेंट डाऊनलोडर. (साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांनी ‘टोरेन्ट्स’ या विषयावर लिहिण्याची मागणी केली होती; पण या विषयावर लिहिणे अजून झाले नाही. याविषयी एक सविस्तर पोस्ट नक्की लिहीन.) तुम्ही टोरेंट क्लाएंट वापरून मोठ्या फाईल्स (सॉफ्टवेअर्स, मूव्हीज) डाऊनलोड करत असाल तर आता वेगळा टोरेंट क्लाएंट वापरायची अजिबात गरज नाही. विझोतून तुम्ही थेट टोरेंट फाईल्स डाऊनलोड करू शकता. याकरता फायर टोरेंट हा क्लाएंट या ब्राऊजरमध्येच समाविष्ट केलेला आहे. याव्यतिरिक्त फायरफॉक्ससाठी उपलब्ध असणारे अनेक लोकप्रिय अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्स यात अगोदरच समाविष्ट करण्यात अाले आहेत.

सुरवातीला केवळ विंडोज अॉपरेटिंग सिस्टिमसाठी उपलब्ध असणारे हे ब्राऊजर आता मॅकिन्तोषसाठीही उपलब्ध झाले आहे. याची लिनक्स आवृत्तीही लवकरच येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेली विझोची आवृत्ती खरोखर देखणी आहे. क्रोमच्या धर्तीवर यातील फीचर्सची पुनर्रचना करण्यात आल्याने हा ब्राऊजर एक वेगळाच आनंद देऊन जातो. विझो डाऊनलोड करा, वापरा आणि तुमच्या प्रतिक्रियाही अवश्य द्या.

Related Posts :0 comments »