,

पुन्हा एकदा बालचित्रवाणी...

June 18, 2009 Leave a Comment

लहानपणी बालचित्रवाणीचे कार्यक्रम म्हणजे माझा 'वीक पॉईंट' होता. विविध पुस्तकं, कॉमिक्स आणि सोबतीला बालचित्रवाणीचे कार्यक्रम असले की दिवस मजेत जायचा. बालचित्रवाणीत कागदी खेळांच्या मदतीने भागाकारपासून बाष्पीभवनापर्यंतचे अवघड प्रकार समजावून सांगितले जायचे. विज्ञानातील कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याचा तो प्रकार अफलातून होता. आता बालचित्रवाणीचे कार्यक्रम बघण्यात येत नाहीत. कदाचित सुरू असतील. पण आज एक साईट पाहण्यात आली आणि बालचित्रवाणीची प्रकर्षाने आठवण झाली.

आज दिवसागणिक एक नवी संकल्पना उदयास येते. सर्वसामान्य लोकांना यातील अनेक संकल्पना माहितदेखील नसतात. मग चारचौघांत बोलताना किंवा मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देताना फजिती होते. अशा लोकांसाठी अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत आणि कागदी खेळांच्या साह्याने अनेक नव्या संकल्पना समजावून सांगणारे खास व्हिडीओ ‘कॉमन क्राफ्ट’ या साईटवर उपलब्ध आहेत. पर्यावरण, बँकिंग, समाजव्यवस्था आणि टेक्नॉलॉजी या विषयांतील विविध संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. सोशल मीडिया म्हणजे काय, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो, सीएफएल आणि साध्या बल्बमध्ये नेमका काय फरक आहे, असे व्हिडीओज या साईटवर उपलब्ध आहेत. व्यावसायिक वापरासाठी या साईटवरील व्हिडीओ खरेदी करावे लागतात.


सिएटलमधील आपल्या छोट्याशा घरात बसून साची आणि ली हे जोडपे ही साईट चालवतात. साची आणि ली यांनी गुगल, लिंक्डइन, फोर्ड आदी कंपन्यांसाठीही खास व्हिडीओ तयार केले आहेत. 'कॉमन क्राफ्ट'वरील विविध व्हिडीओज अॅमेझॉनच्या किंडल ई-बुक रीडरवरदेखील उपलब्ध आहेत.

Related Posts :0 comments »