,

‘अधिक’ माहितीसाठीः टेकटर्म्स, फाईलइन्फो आणि चॅटरेफ डॉट कॉम

June 29, 2009 Leave a Comment

कॉम्प्युटर किंवा इंटरनेटशी संबंधित एखादी संज्ञा (उदा. ActiveX) अडल्यास तुम्ही काय करता? त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करता की तसेच पुढे जाता? हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय, आपल्याला काही घेणं-देणं नाही, असं म्हणून अनेक जण ती संज्ञा समजावून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. वास्तविक एका साध्या गुगल सर्चवरून आपल्याला त्या संज्ञेची हवी ती माहिती मिळू शकते. पण अनेकांना यात फारसा रस नसतो. त्यामुळे एवढी तसदी कोणी घेत नाही. पण ActiveX म्हणजे नेमकं काय, हे चारेक ओळींत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर? शार्पन्ड डॉट कॉम ही साईट गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे असं ज्ञानदानाचं काम करीत आहे.

मे २००९ मध्ये शार्पन्ड डॉट कॉमला दहा वर्ष पूर्ण झाली. पेर ख्रिस्तनसन याने सुरू केलेल्या या साईटभोवती आज अाणखी तीन साईट्स उभ्या राहिल्या आहेत. कॉम्प्युटर आणि इंटरनेटशी संबंधित संज्ञांसाठी टेकटर्म्स, चॅटिंगमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांची उकल करून सांगणारी चॅटरेफ आणि विविध फाईल एक्स्टेन्शनची माहिती देणारी फाईलइन्फो डॉट कॉम या त्या तीन साईट्स.

हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट विश्वातील ए टू झेड संज्ञांची माहिती असलेली टेकटर्म्स डॉट कॉम ही साईट तुमचे या विषयांतील ज्ञान वाढवण्यास नक्कीच मदत करेल.

एखाद्या विचित्र फॉरमॅटमधील (उदा. .jcz) फाईल समोर आल्यास तिचा आगा-पिछा जाणून घेण्यासाठी आणि ती नेमकी कोणत्या प्रोग्राममध्ये ओपन होईल ही माहिती मिळवण्यासाठी फाईल इन्फो डॉट कॉम ही साईट खूप उपयोगाची ठरते. या साईटवरील फाईल एक्स्टेन्सशन्स पाहून गरगरायला होतं!

*$ म्हणजे ‘स्टार आणि डॉलर’ असं उत्तर दिलंत तर तुम्ही मूर्ख ठराल. *$ याचा अर्थ ‘स्टारबक्स’ असा होतो. 143 आणि 143444 अशा सांकेतिक भाषेत चॅट करणाऱ्या नव्या पिढीला पाहून तुम्ही नक्कीच बुचकाळ्यात पडाल. ही मुलं नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करताहेत, हे समजण्याच्या आत ती तुम्हाला गुंडाळून ठेवतील - एवढे सांकेतिक शब्द त्यांच्या डोक्यात फिट असतात. यातील 143 म्हणजे ‘आय लव्ह यू’ आणि 143444 म्हणजे ‘आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच’! चॅटिंगच्या विश्वात अशा शेकडो शब्दांचा सर्रास वापर केला जातो. असे शब्द आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी चॅटरेफ डॉट कॉम ही साईट नक्कीच उपयोगी ठरते. (एखाद्या अनोळख्या व्यक्तीने अचानक 143 म्हटलं तर किमान गोंधळायला तरी होऊ नये, म्हणून असे कोड वर्ड एकदा नजरेखालून तरी घाला. :-))

Related Posts :



1 comments »

  • Jayashree said:  

    bharich. fileinfo aani techterms kharach useful aahet. thanks.