,

मीनाक्षी, स्टीफन आणि आत्मविश्‍वास!

January 3, 2010 Leave a Comment

वर्ष : 2007
स्पर्धा परीक्षेची भीती बाळगून बसलेल्या मीनाक्षीला परीक्षेच्या दिवशी काहीच आठवेनासे झाले. आई-वडील तिची समजून काढून थकले; परंतु ती काही परीक्षेस जायला तयार होईना. अभ्यास व्यवस्थित झाला होता. पुस्तकं, गाईड्‌स, नोट्‌स सगळं वाचून झालं होतं. पण तरी देखील तिला आत्मविश्‍वास नव्हता की आपण व्यवस्थित उत्तरं लिहू शकू. आता काय करणार? शेवटी धाकदपटशा करून आई-वडिलांनी तिला परीक्षेस पाठविले.
मीनाक्षीच्या निकालाकडे आपण नंतर येऊ. तत्पूर्वी एक छोटी गोष्ट वाचा.
वर्ष : 1942
लंडनमधील एक सर्वसाधारण कुटुंब. फ्रॅंक घरातला कर्ता पुरुष. इसाबेल ही त्याची पत्नी. घरात आई, वडील, दोन धाकट्या बहिणी आणि एक भाऊ. त्यावेळी लंडनमधील वातावरण तंग होते. तशात इसाबेल गर्भवती होती. त्यामुळे फ्रॅंकने ऑक्‍सफर्डला जाण्याचा निर्णय घेतला. कालांतराने इसाबेलने एका मुलाला जन्म दिला. स्टीफन असे त्याचे नाव ठेवले. शाळेत असताना स्टीफनला विज्ञान खूप आवडत असे. नंतर तो गणिताकडे आकर्षित झाला. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला भौतिकशास्त्र अधिक आवडू लागले. अशा विचित्र सवयीमुळे स्टीफनचे पुस्तकी ज्ञान फारसे प्रभावी नव्हते. त्यामुळे कॉलेजमधील एका महत्त्वाच्या लेखी परीक्षेत त्याला "बी ग्रेड' असा शेरा मिळाला. नाइलाजास्तव प्राध्यापकांना त्याची तोंडी परीक्षा घ्यावी लागली; आणि त्याच्याशी बोलल्यानंतर परीक्षकांनी जाणवले की आपण एका सर्वसामान्य नव्हे; तर विद्वान विद्यार्थ्याशी बोलतोय. "ब्लॅक होल्स' संदर्भात महत्त्वपूर्ण अभ्यास करणारे स्टीफन हॉकिंग यांच्याशी परीक्षक बोलत होते.

वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत स्टीफन हॉकिंग सुस्थितीत होते. उच्चशिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना "ऍमिओट्रोफिक लॅटरल स्क्‍लेरॉसिस' (एएलएस) या मज्जातंतूशी संबंधित गंभीर आजाराची लक्षणे दिसून आली. पुढे काही महिन्यातच या आजाराने त्यांना ग्रासले आणि हॉकिंग यांचे हात, पाय आणि इतर अवयव निष्क्रिय झाले. दोन-वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाहीत, असे निदान झाल्यानंतरही स्टीफन हॉकिंग डगमगले नाहीत. आत्मविश्‍वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि तो आजही सुरू आहे. स्टीफन हॉकींगना या आजारातून मार्ग काढण्यास मदत करणारे कोण होते जाणून घ्यायचंय? त्यांची पहिली पत्नी इलीन मेसन, त्यांचा आत्मविश्‍वास आणि असिस्टिव्ह टेक्‍नॉलॉजी! हॉकिंग यांची "व्हीलचेअर' त्यांच्यासाठी वरदान ठरली आहे. त्यांच्या "व्हीलचेअर'वर आत्मविश्‍वास आणि टेक्‍नॉलॉजी एकत्र प्रवास करतात. "एएलएस'मुळे स्टीफन हॉकिंग यांची वाचा गेली होती. त्यांना बोलण्यास मदत करण्यासाठी डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेली "डेकटॉक' ही यंत्रणा उपयोगास येते. हॉकिंग यांना जे काही म्हणावयाचे आहे, ते एका "टॉकिंग कॉम्प्युटर'वर फीड केले की "डेकटॉक' त्याचे मानवी आवाजात रूपांतर करते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी किंवा विद्यार्थ्यांशी संवाद साधणे त्यांना शक्‍य होते. अशा प्रकारची अनेक गॅजेट्‌स हॉकिंग वापरत असतात.

स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या व्याधीने जडलेले अनेक विद्यार्थी या जगात असतील. हॉकिंग यांच्याकडे असलेली यंत्रणा त्यांनाही उपलब्ध होऊ शकते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे हवा फक्त आत्मविश्‍वास; आणि एखादी व्यक्ती अधू असेल तर तिच्यात आपोआपच आत्मविश्‍वास निर्माण होतो, असे म्हणतात. मग ज्या व्यक्ती शरीराने धडधाकट असतात त्या मनाने अधू का व्हाव्यात? मीनाक्षीचेच उदाहरण पुन्हा घेतले तर लक्षात येईल, की ऐन परीक्षेच्या दिवशी तिचा आत्मविश्‍वास पूर्ण खचला होता. अशी वेळ येऊ नये म्हणून शरीराने अधू असलेल्या व्यक्ती जर विविध "असिस्टिव्ह टेक्‍नॉलॉजी' वापरत असतील तर शरीराने धडधाकट असलेल्या व्यक्तींनी "टेक्‍नॉलॉजी' का वापरू नये? स्मरणशक्ती, आत्मविश्‍वास वाढविणारी अनेक सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. "गुगल'मध्ये साधा सर्च दिल्यास अशी अनेक सॉफ्टवेअर्स तुम्हाला आढळून येतील. परीक्षेसाठी केवळ अभ्यास कामाला येतो असे नाही. आज जवळपास सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन आहेत. मोबाईलचा वापर केवळ बोलण्यासाठी आणि "एसएमएस' पाठविण्यासाठी केला जातो. त्यापेक्षा त्यातील कॅलेंडर, टू-डू-लिस्ट, रिमाईंडर्स यांचा वापर स्वतःला शिस्त लावण्यासाठी आणि अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी केला तर आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल. "असिस्टिव्ह टेक्‍नॉलॉजी' ही शरीराने अधू असलेल्या व्यक्तींसाठी असली तरी व्यापक अर्थाने त्याची गरज सर्वांनाच भासते.
टेक्‍नॉलॉजीच्या यशस्वी वापरासाठी तुम्हा सर्वांना "बेस्ट ऑफ लक!'

(मीनाक्षीचा निकाल : तो तुमच्यावर अवलंबून आहे. कारण मीनाक्षी ही तुमच्यापैकी अनेकांची प्रतिनिधी. तुम्ही नव्या आणि सहज उपलब्ध असलेल्या "टेक्‍नॉलॉजी'चा वापर आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी केलात, तर मीनाक्षी नक्कीच पास होईल.)
----------

Related Posts :0 comments »