,

आजोबांच्या रेडिओवर "एफएम' कसं ऐकणार?

January 4, 2010 Leave a Comment

शंकर "बेलबॉटम' वैद्य, 1980 ची बॅच
मॅक ऊर्फ मकरंद "बॅगी' क्षीरसागर, 1990 ची बॅच,
राहुल "टाईट फीट' सोळंकी, 2000 ची बॅच आणि
जॉन "लो-वेस्ट' डिसूझा, 2007 ची बॅच

"बॅच' कोणत्याही कोर्सची असू द्या, नावं कोणतीही असू द्या; संबंधित विद्यार्थ्यांना लावलेली बेलबॉटम, बॅगी ही बिरुदं मात्र बदलणार नाहीत. 1980 किंवा त्या अगोदरच्या दशकात बेलबॉटम ट्राऊजर्सची फॅशन होती, आज ती "लो-वेस्ट' जीन्सची आहे. काळानुसार जशी फॅशन बदलते, तसेच तंत्रज्ञानही बदलते. 1994-95 मध्ये भारतात पेजर्सची "फॅशन' होती; आज संग्रहालयात ठेवण्यासाठीदेखील पेजर सापडणार नाही. वैयक्तिक आयुष्यात आपण अनेक गॅजेट्‌स वापरतो. त्यांची एक विशिष्ट "लाईफसायकल' असते. ती उलटून गेल्यानंतरही आपण तेच गॅजेट्‌स वापरत राहिलो, तर आपण काळाच्या मागे राहण्याची शक्‍यता असते. या लेखात टेक्‍नॉलॉजीच्या "लाईफसायकल'बद्दल माहिती करून घेऊ यात...

जवळपास सर्वच नव्या तंत्रज्ञानाची "लाईफसायकल' एकाच पद्घतीची असते. एखादे नवे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या मार्गावर असताना आणि विकसित झाल्यानंतर त्याच्या अनेक चाचण्या घ्याव्या लागतात. येथून एखाद्या तंत्रज्ञानाचा अथवा एखाद्या गॅजेटचा जीवनप्रवास सुरू होतो. तो साधारण 5 अवस्थांमधून जातो. त्यातील सर्वांत पहिल्या अवस्थेचे वर्णन "ब्लीडिंग एज' असे करता येईल.
1. ब्लीडिंग एज ः एखाद्या तंत्रज्ञानात अथवा गॅजेटमध्ये जग बदलून टाकण्याची प्रचंड क्षमता आहे; परंतु अद्याप तसे सिद्ध झालेले नसल्यास त्या अवस्थेस "ब्लीडिंग एज' असे म्हणता येईल. या अवस्थेत "कॅल्क्‍युलेटेड रिस्क' घेतली नाही, तर एखाद्या कंपनीचे मोठे नुकसान होऊ शकते. जसे कंपनीचे नुकसान होऊ शकते, तसेच एखाद्या व्यक्तीचेही वैयक्तिक नुकसान होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. याचा अर्थ, आपल्याला ज्या तंत्रज्ञानाचा आधार घेणे अत्यावश्‍यक आहे, त्यासाठी काही तरी "रिस्क' मात्र घ्यावी लागेल.

2. लीडिंग एज ः तंत्रज्ञानाच्या जीवनप्रवासातील दुसरी अवस्था म्हणजे "लीडिंग एज'. या अवस्थेत एखाद्या तंत्रज्ञानाची किंवा गॅजेटची उपयुक्तता जगाला पटलेली असते, त्याचा वापरही सुरू झालेला असतो; मात्र 100 टक्के वापर कसा करावा, हे समजणारी किंवा समजावून देणारी व्यक्ती उपलब्ध नसते. त्यामुळे "लीडिंग एज' अवस्थेतील तंत्रज्ञान शिकून घेणे आणि त्याचा प्रभावी वापर करणे, हे आव्हान आहे.

3. स्टेट ऑफ द आर्ट ः
माझ्या कामासाठी हे तंत्रज्ञान किंवा हेच गॅजेट सर्वाधिक उपयोगी आहे, अशी सर्वांची खात्री झाली असल्यास आपण "स्टेट ऑफ द आर्ट' टेक्‍नॉलॉजी वापरत आहोत, असे समजावे. आपला भर अशा अवस्थेतील तंत्रज्ञान किंवा गॅजेट वापरण्याकडे असावा.

4. डेटेड ः काही गॅजेट्‌स अनेक वर्षं साथ देतात. अनेक वेळा दुरुस्ती करून, स्पेअर पार्टस बदलून ते सुरू ठेवण्याचा आपला आग्रह असतो. यात गैर काहीही नाही. खिशातले पैसे खर्च करून खरेदी केलेल्या वस्तू पुरेपूर वापरल्याच पाहिजेत. तथापि, त्या काळाला धरून आहेत ना, याची वारंवार खात्री केली पाहिजे. त्या जर "डेटेड' असतील, तर जरूर वापराव्यात; पण त्याच वेळी "लीडिंग एज' अवस्थेतील एखाद्या नव्या गॅजेटचादेखील विचार करावा.

5. ऑब्सोलीट ः तुम्ही वापरत असलेल्या एखाद्या तंत्रज्ञानाशी किंवा गॅजेटशी तशाच प्रकारचे दुसरे गॅजेट "स्टेट ऑफ द आर्ट' अवस्थेतून स्पर्धा करीत असेल तर समजावे, की आपण कालबाह्य किंवा "ऑब्सोलीट' तंत्रज्ञान किंवा गॅजेट वापरत आहोत. अशा तंत्रज्ञानाच्या प्रेमात फार काळ अडकून राहणे योग्य नव्हे. जितक्‍या लवकर आपण त्या गॅजेटपासून दूर जाऊ, तितक्‍या अधिक वेगाने आपण प्रगती करू.

वैयक्तिक आयुष्यात आपण नानाविध गॅजेट्‌स वापरत असतो. अनेक गॅजेट्‌स (?) परंपरागत असतात. उदा. 1962 मध्ये आजोबांनी घेतलेला रेडिओ. योग्य निगा राखल्यामुळे तो आजही चालतो. पण त्यात "एफएम' ऐकू येत नाही, आणि म्हणून चारचौघात "आरजे मलिष्का'ने केलेले विनोद कळत नाहीत. आता यात तुमच्या आजोबांचा दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यांचा रेडिओ आज "स्टेट ऑफ द आर्ट' अवस्थेत आहे का "ऑब्सोलीट', याचा विचार तुम्हालाच करायचा आहे.

(वि. सू. ः "बेलबॉटम' घालणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय "लो-वेस्ट जीन्स' घालण्याचा प्रयोग करू नये. केल्यास लेखक जबाबदार नाही.)

Related Posts :2 comments »

  • Prakash Ghatpande said:  

    इन्फोटेन्मेंट सदरातील उत्तम ब्लॊग. सोप्या व मनोरंजक भाषेत तंत्रज्ञान व त्याच्याशी निगडीत व्यवहार ज्ञान लोकांपर्यंत पोचवणारा अन्य लेखन माझ्या वाचनात नाही. इंटरनेट न वापरणार्‍या वर्गापर्यंत पोचण्यासाठी दै. सकाळ ने जर याची वर्षभर चालणारी लेखमाला काढली तर ते अधिक उत्तम होईल. त्यानंतर याचे पुस्तक काढता येईल.

  • Amit Tekale said:  

    धन्यवाद प्रकाशजी.
    माझ्या नव्या लेखमालेबद्दल लवकरच सांगेन.