,

मिसेस जोशींचे मिक्‍सर दुरुस्त होईल?

January 5, 2010 Leave a Comment

""दादा, एवढं दुरुस्त करून द्याल का?''
""हे काम आपण करत नाही मॅडम, कोपऱ्यावरच्या दुकानात जा.''
""इसको ठीक करने के लिए नया मशिन लगता है मॅडम. वो अपने पास नही है.''
""याला कुठे दुरुस्त करणार मॅडम? एक्‍स्चेंजमध्ये देऊन टाका.''
""अवघड आहे. ठेवून जा. पंधरा दिवसांनी चक्कर मारा. बघू जमलं तर''

नादुरुस्त झालेले मिक्‍सर घेऊन मिसेस जोशी सकाळपासून फिरत होत्या. प्रत्येक दुकानात त्यांना अशीच उत्तरं मिळत होती. कोणत्याही दुकानात त्यांना मिक्‍सर दुरुस्त होईल, याची खात्री मिळाली नाही. मिक्‍सर बंद पडण्याचे कारण अतिशय किरकोळ होते आणि ते दुरुस्त होईल याची खुद्द मिसेस जोशींना खात्री होती. पण प्रत्येक दुकानदाराने त्यांच्यामोर "ना'चा पाढा वाचल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. या नकारार्थी भूमिकेमुळे आपण स्पर्धेतून अलगद बाहेर फेकले जातोय याची त्या भाबड्यांना कल्पना नव्हती. दिसामाजी चार-पाचशे रुपये कमावणारे असो किंवा मिनिटाला लाखो डॉलर कमावणारे असो, नवे तंत्रज्ञान आणि नवी आव्हाने स्वीकारण्यास नकार देणे प्रचंड महागात जाऊ शकते. पुढील तीन उदाहरणांवरून तुम्हीच ठरवा, नव्या वर्षात नव्या तंत्रज्ञानासाठी "पॉझिटिव्ह' राहायचं की "निगेटिव्ह'?

--------
""मला खरोखरच हार्ड डिस्क हा प्रकार आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्ड डिस्क हा "सोनी'चा प्रांत नव्हे. एक इंजिनिअर म्हणून सांगायचं झालं, तर हार्ड डिस्कवर गाणी साठवणं हा तितकासा आकर्षक प्रकार नाहीये.''
---------
"सोनी कॉर्पोरेशन'मधील एका वरिष्ठ इंजिनिअरने "वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये वरील प्रतिक्रिया दिली होती. संदर्भ होता, "ऍपल'ने नव्याने बाजारात आणलेल्या मेमरी-बेस्ड एमपीथ्री प्लेअरचा - अर्थात "आयपॉड'चा! "वॉकमन'च्या रूपात संगीत रसिकांना मोहून टाकणाऱ्या "सोनी'ने मेमरी-बेस्ड एमपीथ्री प्लेअरला कधी गांभीर्याने घेतलेच नाही. त्यामुळे 2001 मध्ये बाजारात आलेल्या "ऍपल आयपॉड'ला "एमपीथ्री प्लेअर'च्या बाजारपेठेचा अनभिषिक्त सम्राट बनणे शक्‍य झाले. आज जवळपास पावणेसात कोटी ग्राहकांच्या मनात "आयपॉड' विराजमान झाला आहे आणि "सोनी'चा या बाजारपेठेतील हिस्सा केवळ 1 टक्का इतका आहे...

---------
""तुम्ही जे काही तयार केलंय ते खरोखरच अप्रतिम आहे. एक काम करा, तुम्ही स्वतःच एक सर्च इंजिन तयार करा. ते जेव्हा यशस्वी होईल तेव्हा माझ्याकडे या. त्या वेळी मी विचार करेन.''
---------
स्टॅनफर्ड विद्यापीठात पीएच.डी. पूर्ण करणारे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन इंटरनेटवरील "सर्च इंजिन'साठी "बॅक एंड' प्रणाली तयार करून ती विकण्यासाठी "याहू डॉट कॉम'चे संस्थापक डेव्हिड फिलो यांच्याकडे गेले होते. त्या वेळी डेव्हिडने त्यांना वरील उपदेश दिला होता. डेव्हिडप्रमाणेच अनेकांनी लॅरी आणि सर्जीच्या कष्टांचे कौतुक केले; परंतु त्यांनी विकसित केलेल्या कल्पनेकडे नकारार्थी भूमिकेतून पाहिले. एकाने तर चक्क, ""आमच्या ग्राहकांना सर्च वगैरे करण्याची गरजच पडत नाही,'' असे उत्तर दिले. आज त्यांचे नावही कुठे ऐकावयास मिळत नाही. लॅरी आणि सर्जीने स्थापन केलेल्या "गुगल'ची आजची उलाढाल सात अब्ज डॉलरच्या घरात आहे!

---------
""या शतकाच्या अखेरपर्यंत, अर्थात 2000 पर्यंत जगभरातील फार तर नऊ लाख ग्राहक "मोबाईल फोन'चा स्वीकार करतील, असा आमचा अंदाज आहे.''
---------
"द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकात प्रसिद्घ झालेल्या अहवालात एका जगप्रसिद्ध कन्सल्टिंग कंपनीने वरील अंदाज व्यक्त केला होता. 2000 पर्यंत जागतिक मोबाईल बाजारपेठ कुठपर्यंत पोचेल याचा अंदाज घेण्यासाठी 1980 च्या सुमारास "एटी अँड टी'नेच या कंपनीकडे हे काम सोपविले होते. मोबाईल फोनबद्दल नकारार्थी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा अंदाज साफ चुकला आणि याच अहवालाचा दाखला देत "एटी अँड टी'ने हळूहळू टेलिकॉममधून अंग काढून घेतले. 2000 पर्यंत जगभरात सुमारे 60 कोटी मोबाईलधारक होते. आज हाच आकडा अडीचशे कोटींच्या घरात गेलाय. आज दर मिनिटाला जगात सुमारे एक हजार जण नव्याने "मोबाईल' होतात.

आता तुम्हीच सांगा, मिसेस जोशींचे मिक्‍सर दुरुस्त होईल की नाही?

Related Posts :0 comments »