सचिन सीताराम देसाईया तरुणाला तुम्ही ओळखता?
वय ः 24, राहणार ः नंदुरबार
आलं काही लक्षात?
काळे डोळे, उंची साधारण पावणेसहा फूट
आठवतंय काही?
ट्रेकिंगची आवड, किशोर कुमार फॅन
अजूनही "क्लिक' होत नाहीये?
धुळ्यातील एका प्रोफेशनल कॉलेजमध्ये शिकतो.
छ्याऽऽ काहीच लक्षात येत नाहीये. कोण आहे हा सचिन सीताराम देसाई?
तुम्हाला फक्त सचिन रमेश तेंडुलकरच माहीत असेल. पण 110 कोटींच्या आपल्या देशातील 40 कोटींहून अधिक जण "तरुण' वर्गात मोडतात. त्यात किमान एक कोटी "सचिन' असतील असे गृहित धरूयात. यातील फक्त एक सचिन आपल्याला माहित आहे. इतर 99 लाख 99 हजार 999 सचिन अजूनही आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताहेत...
सचिन सीताराम देसाई तुम्हाला माहीत नसेल. पण त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सुरवात केली आहे. ब्राझिल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान येथे त्याला ओळखणारे किमान 50-60 तरुण आहेत. त्याच्या गावात, महाराष्ट्रात आणि भारतात मिळून त्याचे 200 हून अधिक जणांशी नेटवर्किंग आहे. या नेटवर्कमधील मित्र-मैत्रिणींशी तो कायम संपर्कात असतो. कसा? अर्थात...इंटरनेटच्या साह्याने. सचिन सीताराम देसाई 4 वेगवेगळ्या ऑनलाईन नेटवर्किंग साइट्सचा सदस्य आहे. या साइट्सच्या माध्यमातून त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. सचिन "एमबीबीएस'च्या अंतिम वर्षात आहे. त्याच्या वयाच्या आणि परदेशात हाच अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांशी त्याने ऑनलाइन मैत्री केली आहे. त्यांच्या मदतीने तो जगाच्या विविध भागांत वैद्यकीय क्षेत्रांत आणि तंत्रज्ञानात काय बदल होताहेत याची माहिती मिळवितो. यात काही वाईट आहे, असं वाटतं तुम्हाला?
नव्या युगातील तरुणांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत होत आहे आणि त्यांना अशा प्रकारची मदत उपलब्ध करून देणे हे पालकांचे आणि इतर काळजीवाहूंचे कर्तव्य ठरणार आहे. तारुण्यात प्रवेश करणाऱ्यांसमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वतंत्र अस्तित्व अर्थात "आयडेंटिटी'. हा काळ अत्यंत नाजूक असतो, याची पालकांना कल्पना असते. तथापि, या संक्रमणात आपलीही काही भूमिका असते, हे विसरून गेल्यास त्याचा थेट परिणाम पाल्यांवर होतो. तुला कशाला हवाय मोबाइल, जास्त वेळ इंटरनेट वापरायचे नाही, काल कुणाशी चॅटिंग चालले होते, दिवसभर काय चॅटिंग करायचे अशा प्रश्नांचा भडिमार करून काहीही साध्य होणार नाही. उलट आपल्या पाल्याची आपण घुसमट करतोय, हे ध्यानात घ्यावे. पाल्याच्या सवयींवर नजर ठेवणे, तो किंवा ती काही गैरप्रकार करत नाहीये ना यावर लक्ष ठेवणे यात काहीही वाईट नाही. तथापि, हे कारण देऊन त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे योग्य नव्हे.
नव्या भाषेत सांगायचे झाले तर "पीअर टू पीअर इंटरॅक्शन'ला येणाऱ्या काळात महत्त्व प्राप्त होणार आहे. आज अनेक व्यवहार हे केवळ ई-मेलच्या माध्यमातून होतात. माझा व्यवसाय वाढविण्यासाठी जगाच्या पाठीवर एखादा उत्तम "पार्टनर' मिळतोय का येथपासून माया सोबत आयुष्य काढण्यासाठी सुयोग्य "लाइफ पार्टनर' मिळतोय का, हे तपासण्यासाठीदेखील बहुतांश तरुण आज "ऑनलाईन नेटवर्किंग' साइट्सचा वापर करतात आणि विशेष म्हणजे त्यात ते यशस्वीदेखील होतात. थोडक्यात, स्वतंत्र अस्तित्व विकसित करण्यासाठी तरुणांना तीन प्रक्रियांतून जावे लागते.
1. Reflexivity
2. Makeability
3. Individualisation
रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पटलावर स्वतःची प्रतिमा तयार करणे, मेकॅबिलिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीवरून प्रभावित होऊन स्वतःची लाइफस्टाइल किंवा स्वतःच्या आवडीनिवडी ठरविणे आणि इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे इतरांच्या भाऊगर्दीत अंतर्मनाला अधिक "स्पेस' देणे. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आजच्या काळात तंत्रज्ञानाला पर्याय नाही.
मायस्पेस, फेसबुक, ऑर्कुट, बझओव्हनसारख्या ऑनलाईन नेटवर्किंग वेबसाईटच्या माध्यमातून जगभरातील 15 कोटींहून अधिक तरुण एकमेकांशी जोडले गेले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे भौतिक सीमारेषा पुसट होऊन जगात "बॉर्डरलेस नेशन्स' तयार होत आहेत. या सीमारेषा संपूर्णपणे पुसून टाकण्याचे काम तरुण पिढीच करणार आहे. त्यांना या कामात आपण मदत करू इच्छिता, की अशा वेबसाइट्सवर बंदी आणून या सीमारेषा आणखी गडद करू इच्छिता?
Read the full story »
Hot Launches!